- गुरुवार व्रताचे नियम (मार्गशीर्ष गुरुवार व्रत)
- गुरुवार व्रत कथा – श्री महालक्ष्मी-व्रताची कथा (Guruvar Vart Katha Margashirsha in Marathi)
- श्री महालक्ष्मीच्या आरती – मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा मराठी आरती (Mahalaxmi Aarati)
- महालक्ष्मी गुरुवार व्रत कथा PDF डाउनलॊड: Mahalaxmi Guruvar Vrat Katha in Marathi PDF download
गुरुवार व्रताचे नियम (मार्गशीर्ष गुरुवार व्रत)
- गुरुवार व्रत – व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करावी आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे.
- जर आपणास मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार व्रत करण्यास जमले नाही. तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करावी
आणि आठव्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे. मात्र या व्रतासाठी मार्गशीर्ष महिन्याचे आणि गुरुवारचे महत्व विशेष आहे. - गुरुवारी सकाळी स्नान करून शरीर आणि मन दोन्हीही स्वच्छ करून. हा पूजा विधी करावा. सकाळी उपवास करावा.
केळी दूध फळे असा आहार घ्यावा, मात्र उपाशी राहू नये. - काही अचानक व्यक्ती आलास पूजा आणि आरती दुसऱ्याकडून करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतः करावा.
- एकादशी शिवरात्र अशा दिवशी पूजा आरती करून व्रताची कहाणी वाचावी किंवा ऐकावी, पूजा आणि आरतीचा लाभ घेणयासाठी शेजाऱ्यांना ही बोलवावे
पण त्यावेळी शांतता असली पाहिजे. पूजेच्या दिवशी शक्य असल्यास गाईची पूजा करावी व गोग्रास द्यावा.
गाय लगेच न मिळाल्यास नंतरही देऊ शकतो. - व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी सात सुवासिनींना किंवा कुमारिकांना घरी बोलवावे.
त्यांना बसायला असून द्यावे पूजा आणि आरती पूर्ण झाल्यानंतर त्यांना लक्ष्मी रूप मानून हळदीकुंकू द्यावे. एक एक फळ द्यावे.
श्री महालक्ष्मी ची स्थापना, पूजा व विसर्जन विधी – गुरुवार व्रत पूजा विधी – Guruvar Vrat Puja
१) ही पूजा करण्यास ब्राह्मणाची (गुरुजींची) आवश्यकता नाही, आपणच मनोभावे ही पूजा करावयाची आहे.
देवीचे तोंड पूर्वेकडे करून किंवा उत्तरेकडे करुन ठेवावे. म्हणजे पूजा करणाऱ्याचे तोंड पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे होईल.
२) पूजेची जागा जमल्यास गाईच्या शेणाने सारवावी. फरशी असल्यास, ओल्या फडक्याने पूसून घ्यावी.
त्यावर चौरंग किंवा पाटावर गहू किंवा तांदूळ वर्तुळाकर पसरुन ठेवावे. त्यावर कुंकवाचे स्वास्तिक काढावे.
३) एक तांब्याचा तांब्या तर दुसऱ्या धातुचा चालेल, तो स्वच्छ घासुन घ्यावा. त्यात पाणी भरावे.
त्या पाण्यात एक सुपारी, पैसा व दूर्वा घालाव्यात. कलशाच्या तोंडावर पाच प्रकाराच्या झाडाच्या पाच डहाळया
किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाच पाने रचुन त्यावर नारळ ठेवावा. नारळाची शेंडी वर असावी.
४) कलशाच्या बाहेरच्या बाजूला हळदी कुंकवाची बोटे आठ दिशांना लावावी. नंतर तो कलश गहु किंवा तांदळाच्या जो गोल केला आहे,
त्यावर ठेवावा. पुस्तकाचे सुरुवातीस महालक्ष्मीचे चित्र छापले आहे ते पुठ्ठयावर चिकटवावे किंवा
त्याची फोटो फ्रेम करून कलशाला टेकुन समोर ठेवावी किंवा महालक्ष्मीची मुर्ति असल्यास ती ठेवावी.
५) पाटावर किंवा चौरंगावर उजव्या बाजूस थोडेसे तांदुळ (मुठभर) ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी.
६) चौरंगावर मध्यभागी, कलशाच्या पुढे आपल्यासमोर गणपतीकडे तोंड केले असता, डाव्या बाजूस दोन देठाची पाने त्यावर नाणे व सुपारी ठेवावी.
७) घरातील देवास व वडील माणसांस नमस्कार करुन प्रथम गंधफुल, अक्षता वाहुन श्रीगणपतीची पुजा करावी उदबत्ती ओवाळावी,
गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा व प्रार्थना करावी.
वक्रतुंडमहाकाय सुर्यकोटीसमप्रभ । निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
८) चौरंगावरील ठेवलेल्या विड्याच्यापानांवर नाणे सुपारी ठेवलेल्या विडयावर पळीने पाणी सोडावे.
९) मग
म्हणुन ताम्हानात दोन पळ्या पाणी उजव्या हातावरुन सोडावे.
१०) नंतर देवीला स्नान घालावे. तेजबीर असल्यास फुलाने, तुळशीपत्राने पाणी शिंपडावे. कागद खराब होवू देवू नये.
११) मग हळद – कुंकू, अष्टगंध, फुले अलंकारार्थ अक्षता वहाव्यात आणि अगरवत्ती, धूपदीपाने ओळावावे,
नैवेद्य अर्पण करुन देवीस आपली इच्छा सांगावी व पुर्तेतेसाठी हात जोडुन प्रार्थना करावी.
१२) देवीसमोर पाटावर बसुन प्रथम श्रीगणपतीची कहाणी व मग श्री महालक्ष्मी कथा (कहाणी) व श्रीमहालक्ष्मी महात्म्य वाचावे.
दोन्हीही या लेखात मध्ये दिल्या आहेत. आपल्याला वाचता येत नसेल किंवा अडचण असेल तर दुसऱ्याकडुन वाचुन घ्यावे.
१३) पुन्हा नैवैद्य दाखवून मग श्रीमहालक्ष्याष्टक म्हणावे. श्रीमहालक्ष्याष्टक खाली दिले आहे. यापूर्वी देवीस आपली इच्छा मनात सांगुन,
निरांजन ओवाळुन साष्टांग नमस्कार करुन, पुर्ततेसाठी प्रार्थना करावी.
१४) सायंकाळी लक्ष्मीची पूजा आरती (खाली दिली आहे) करुन गोड धोडाचा नैवैद्य दाखवावा गोग्रास काढून ठेवावा.
लगेच गाय मिळाल्यास अगर नंतर गाईस घालावा. उद्यापनाचे दिवशी सुवासिनी ब्राह्मणास भोजन व दक्षिणा द्यावी.
१५) नैवेद्याचे पान आपण घ्यावे.
१६) दुसरे दिवशी स्नान करुन गणपती व कलश यावर अक्षता वहाव्यात व पुनारागमनायचे असे म्हणावे मुर्तीवर अक्षता टाकु नयेत.
१७) मग कलशातील पाणी तुळशीवृंदावनात विसर्जन करावे व पाने घराबरोबर नेवून पाच ठिकाणी ठेवावीत.
घरात आल्यावर पुजेच्या जागी दोन वेळा हळदकुंकू, अक्षता वाहुन नमस्कार करावा.
१८) हे व्रत मार्गशीर्ष महिन्यात सर्व गुरुवारी करावे (शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे) किंवा एकुण आठ गुरुवारपर्यंत करता येते.
१९) या व्रताची कथा पद्यपुराणात आहे. देवीच्या कृपाप्रसादाने सुख शांती, धनवृध्दी, वैभव संततिप्राप्ति ह्या गोष्टी भक्तांस प्राप्त होतात.
गुरुवार व्रत कथा – श्री महालक्ष्मी-व्रताची कथा (Guruvar Vart Katha Margashirsha in Marathi)
मन लावून ऐकावी. ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी, द्वापार युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी,
मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा मराठी (Guruvar lakshmi vrat katha in marathi)
श्री महालक्ष्मी देवी, आटपाट नगर होतं, नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता.
देवांना, जनतेला आणि साधू संतांना सुखवीत होता. आनंद देत होता.
राजाच्या राणी चे नाव सुरतचंद्रिका होतं. नाव चांगल, पण स्वभावात अहंकार, मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती,
तिचं नवऱ्याशी भांडण होत असे. भांडणान वैतागली, रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून,
तिथं तिला. दिसली सुवासिनी, त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत, ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं, दुःख विसरली, दारिद्र्य गेलं,
परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला.
स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं. भद्रभवा राजाशी तिचा विवाह झाली. ऐस्वार्थात लोळू लागली. गर्वान ती फुगली.
गरिबांना विसरली, तोऱ्या ताठ्याने फुगली दासदासीवर रागावली.
एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण यावी. ओळखते की नाही,
हे बघावं. राणी राजवाडयात सुखाने रहात होती. राजाही तिचे कौतुक करी, तिचे लाड पुरवी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि
एक कन्या झाली. कन्येचं नाव होतं शामबाला.
एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचे रूप घेतलं, फाटके वस्त्र नेसली, माथी मळवट फासला. हाती काठी घेतली.
काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली- अरे आहे का घरात कुणी ? कुणी घास देईल का ? दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली, तिनं विचारलं, कोण गं तू ? आलीस कुठनं ? काय काम काढलं आहे ? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवं काय ? मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली. माझं नांव कमला. व्दारकेहून आले आहे! राणीला भेटायचय ! कुठे आहे गं राणी ? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत। सख्यांशी गप्पा मारताहेत! त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला गं त्या कशा भेटणार !
काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उण- दुण बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोश्याला बस.
मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना! म्हातारी रागवली मनोमन संतापली. ‘तुझी राणी पैशाला भाळली. माणुसकी विसरली. दरिद्री मेली ! आज झालीय राणी पण देवीला विसरली.
माझ्यामुळेच ना! मीच तिला व्रत सांगितलं देवींच ! आज ते केल. आता राणी पदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा ! पैशांची धुंदी आलीय! गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा- मोठ्यांच्या मुली. त्या झाल्या मैत्रिणी ! म्हातारी गरीब अन् भिकारीण! तिला कोण विचारतंय ! पण, याचं फळ तिला भोगावचं लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी.
दासी घाबरली, तिनं म्हातारीला पाणी दिलं, होत जोडून म्हणाली, ‘ते व्रत मला सांगाल’ ! मी ते नेमानं करीनं उतणार नाही, मातणार नाही,
घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी ठेकीत निघाली,
तोच माडीवरुन राणीची कन्या शामबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, ‘आजी रागावू नका, चुकली माझी आई ! तिच्या वतीनं मी क्षमा मागते, कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या ! म्हातारीला मुलीची दया आली. म्हातीरीनं क्षणभर त्या मुलीकडे पाह्यालं,
आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच राणी माडीवरुन आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली’ !
राणी ओरडली, ए थेरडे ! कशाला गं आलीस ? जा इथून ! उठ म्हणतेय ना ! जातेस की नाही ? दुसरी घरं नाही दिसली तुला ?
म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरविले. कपाळावर आठया पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती सुधारली ! दासीपणं गेलं, संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शामबालेन लक्ष्मीव्रतास सुरुवात केली.
सगळे नेमधर्म पाळले. चार गुरुवरी तिन लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं.
सिध्देश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी शामबालेचा विवाह झाला. राजवैभवातील शामबलेला राजवैभव मिळालं.
हा होता. लक्ष्मीव्रताचा प्रभाव, सुखा – समाधानानं संसार चालू होता. भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले.
शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचे राज्य लुबाडलं, सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले,
रानावनात फिरुन राजा – राणीने कष्टाने दिवस काढत होते.
भद्रश्रवला कन्येला भेटावसं वाटलं तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला.
नदीकडे येतांना राणीच्या दासीनं भद्रश्रवला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाडयात गेली. राजाला सांगितलं. मालधरानं माणसं पाठवली.
आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. शामबाला वडिलांची काळजी घेत होती.
काही दिवसांनी राजाला वाटलं, आता परत जावं, जावायला तसं त्यांन सांगितलं, मुलीचा निरोप घेतला.
जावायानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं, राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला,
हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय, तिचा कोळसेच दिसले.
सुरतचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते.
दरिद्रय सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सुरतचंद्रिकेचा एकेक दिवस दुःखाचा जात होता.
एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरुन पहावं वाटलं, नशिबाचे भोग भोगायचेच आहेत, सुरतचंद्रिका घरुन निघाली,
मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता. नदीतीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली
तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आलीय. नदीकिनारी बसलीय,
खूप दमलेली दिसली. तिला आणायला कुणीतरी पाठवा.
शामबालेनं सारथ्यासोबत रथ नंदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली.
आईला बघताच शामबालेनं आनंदाने मिठी मारली. मुलींच वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं.
मुलीनं तिला पैठणी दिल्ली. सोन्या- मोत्यांचे दागिने दिले. आईचं रुप अधिकच खुललं.
दुपारची वेळ झाली. शामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळला.
शामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलावलं. सुरतचंद्रिका पाटावर येऊन बसली.
पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली,
शामा मीदेखील तुझ्यासोबत उपासच करीन! शामा म्हणाली, ठीक आहे, मार्गशीर्ष महिना होता, मुलीनं चारही गुरुवारी व्रत केल
ते आईनं पाहिलं तीही उपवास करु लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला.
पोहोचवायला शामबाला सोबत गेली.
चारदिवसांनी शामबाला निघाली. मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरले तो नोकराजवळ।
देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता. त्याचेही भान तिला नव्हते.
मालाधरानं विचारलं माहेराहून काय आणलंस? शामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं मालधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं! त्यात त्याला काय दिसलं ? मिठाचे खडे !
अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथ मिळत नाही मीठ ? मीठ मिळत ना? पण हे मीठ माझ्या वडिलांच्या
राज्यातलं आहे. वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ ! समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांच राज्य होतं. आज….. शामबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली. तो विचारांत गुंगला.
शामयाला म्हणाली, हे मीठ जीवाचं अमृत आहे ! अन्नाला चव येते ती मिठानंच ! मीठ नसलेला पदार्थ हा अळणी.
ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्यांच रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयान उठला.
त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रभवाला काय झालं कळलं नाही.
ताबडतोय तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला, भद्रश्रवान अनुमती दिली. मालाधरान मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं.
सेनापती आले, त्यांनी मालाधराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज ते म्हणाले, भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोय स्वारी करा.
प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एकेक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली.
तशी सेनापतीनं व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले.
मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता.
शेवटी मालधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळविला.भद्रश्रवाचे राज्य पुन्हा मिळवलं.
मालाधराला व शामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रूराज्यातील खजिना लुटला.
अफाट संपत्ती मिळाली, ती पोत्यात भरुन मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती
आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवास सुरतचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं,
ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार ! शामबालेन लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली.
धूप – दीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईने उपवास केला.
रात्री देवीची आरती झाली देवीला नैवैद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं.
मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. मंगल मूहूर्ताचा दिवस.
मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केले. त्याने या व्रताची सांगता आली. राजा राणी सौराष्ट्रात आले.
सुरतचंद्रिकन पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची परिस्थिती सुधारली.
राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई-वडिलांना आनंद झाला.
याव्रतामुळे राजा-राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरलं. अशी साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
सर्वांनी देवीला वंदन करावं. आपल घर सदैव आनंदित रहावे अशी लक्ष्मीदेवीला प्रार्थना करावी.
श्री महालक्ष्मीच्या आरती – मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा मराठी आरती (Mahalaxmi Aarati)
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापक रुप तू स्थूल सूक्ष्मी ॥ध्रु.॥ करविरपुरवासिनी सुरबर मुनिमाता । पुरहरवरदायिनी
मुरहरप्रियकांता कमलाकरें जठरी जन्मविला धाता। सहस्त्रवदनी भूधर न गुणगांता ॥१॥
मातुर्लिंग गदा खेटक रविकिरणी । झळके हाटक – वाटी पियूष रसपाणी । माणिकरसना सुरंगबसना मृगनयनी ।
शशिकरवदना राजस मनदाची जननी | जय देवी ॥२॥
ताराशक्ति अगम्य शिवभजका गौरी। सांख्य म्हणति प्रकृति निर्गुण निर्धारी ॥ गायत्री निजबीजा सारी ।
प्रकटे पद्मावती निजधर्माचारी ॥ जय देवी ॥३॥
अमृत भरिते सरिते अनुदुरिते चारी। मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारी। वारी मायापटल प्रणमत परिवारी ॥
हे रुप चिद्रूप दावी निर्धारी ॥ जय देवी . ॥४॥
चतुरानने कुश्रित कर्माच्या ओळी । लिहिल्या असतील माते माझे निजभाळी पुसोनि चरणांतली पदसुमने क्षाळी ॥
मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी ॥ जय देवी ॥५॥
महालक्ष्मी अष्टाक्षरी मंत्र (Mahalaxmi Ashtakshari Margashirsha Guruvar Mantra in Marathi)
प्रथमं भारती नाम |
व्दितीयं तु सरस्वती ।
तृतीय शारदादेवी।
चतुर्थ हंसवाहिनी।
पंचमं जगती ख्याता ।
षष्ठं महेश्वरी तथा ।
सप्तम तत्तु कौमारी ।
अष्टमं ब्रह्मचारिणी।
नवमं विद्याधात्रिति ।
दशमं वरदायिनी ।
एकादंश रुद्रघंटा ।
व्दादशं भुवनेश्वरी ।
एतानि व्दादशो नामानि ।
यः पठेच्छुणुयादापि ।
नच विघ्नभयतस्या सर्वसिध्दीकरं तथा ॥
॥ ॐ ऐ श्री महालक्ष्मी नमः ॥
(टीप: रोज १०८ वेळेस केल्यास सर्व दुःख हरण होवून मनोरथ पूर्ण होतात व मनशांती लाभते)
महालक्ष्मी गुरुवार व्रत कथा PDF डाउनलॊड: Mahalaxmi Guruvar Vrat Katha in Marathi PDF download
हे हि वाचा: