Vaibhav Laxmi Vrat Katha Marathi : वैभव लक्ष्मी व्रत कथा विधी मराठी

Vaibhav Laxmi Vrat Katha
Vaibhav Laxmi Vrat Katha

स्त्री आणि पुरुष कोणालाही हे वैभव लक्ष्मी व्रत करता येते. श्री वैभवलक्ष्मी मातेचे व्रत श्रध्दामय अंतःकरणाने व प्रसन्नतेने करावे
आणि ते करताना इतरांचेही कल्याण व्हावे अशी भावना ठेवावी.

Table of Contents

वैभव लक्ष्मी व्रत नियम (शुक्रवार व्रत वैभव लक्ष्मी चे)

  • सुवासिनी स्त्रिने हे व्रत केले तर फारच चांगले. घरात सुवासिनी नसल्यास
    इतर कोणाही स्त्रीने किंवा कुमारिकेने हे व्रत केले तरी चालते. पुजा आपण स्वत: मनापासून करावयाची आहे.
  • गुरुजींची आवश्यकता नाही. पुजाविधी पुढे दिला आहेच.
  • एखाद्या अचानक आलेल्या अडीअडचणीनें एखादा शुक्रवार करता आला नाही तरी चिंता करु नये ,
    पुढील शुक्रवारी व्रत करावे आणि एकूण संख्या पुर्ण करावी. लक्ष्मीमातेची एकूण आठ चित्रे आहेत.
    त्या त्या स्वरुपात व्रत पुजा करण्यापूर्वी मातेला वंदन करावे. व श्रीयंत्राला वंदन करावे.
  • शुक्रवारी व्रताच्या दिवशी उपवास करावा म्हणजे उपाशी राहु नये, उपवासचे खावे किंवा दुध, केळी, इ. फलाहार करावा.
    संध्याकाळी पूजन झाल्यावर उपवास सोडावा.
  • व्रत करणाऱ्या व्यक्तीला म्हातारपणामुळे, आजारी असल्यामुळे किंवा कोणत्याही कारणाने
    उपवास करणे जमत नसेल तर उपवास नाही केला तरी चालते. जे करावयाचे ते मनोभावे करावे.
  • व्रत शास्त्रशुध्द पद्धतीने करावे, व्रताची संख्या पुर्ण झाल्यास उद्यापन करावे.
  • घरात सोन्याचा अगर चांदीचा दागिना नसल्यास रुपयाचे नाणे कलशावरील वाटीत पुजेसाठी घ्यावे.
  • उद्यापनाच्या दिवशी ५ किंवा ७ कुमारीकांना आमंत्रण देऊन कथेत सांगितल्याप्रमाणे त्यांना लक्ष्मीचे रूप मानून त्यांचा सत्कार करावा.
  • मातेच्या व्रताचे दिवशी शक्य तितके कमी बोलावे. मनात नामस्मरण करत रहावे. अंतर्बाह्या शुध्दता ठेवावी व सर्व मनोभावे करावे.

वैभव लक्ष्मी व्रत विधी आणि पुजा कशी करावी (Vaibhav Laxmi Vrat Vidhi)

आता आपण जाणून घेऊया वैभव लक्ष्मी व्रताची पूजा कशी करायची आणि वैभव लक्ष्मी व्रताचा विधी

पूजेचे साहित्य

  • देवपुजेसाठी शुध्द पाण्याने भरलेला  तांब्या/कलश, श्रीयंत्रचित्र अथवा तांब्याचे श्रीयंत्र
  • तेलवातीसह समई, निरांजन, तूपवातीसह, शंख, घंटा
  • पाण्याने भरलेला दुसरा तांब्या/ कलश, ताम्हण, फुलपात्र
  • पळी, वाटीत अक्षता आणि दागिना
  • उगाळलेले गंध, धुतलेल्या शुभ्र अक्षता, पांढरे शुभ्र कापड,चौकोनी रुमाल
  • बेल फुले, तुळशीचे पान, मंजिरी, प्रामुख्याने लाल फुले,
  • हळदीकुंकू, शेंदुर, अष्टगंध, बुक्का फुलवाती, कापुर
  • विड्याची देठासह पाने, २ सुपाऱ्या, दूध, दही, तूप,मध, साखर (पंचामृत साठी)
  • नारळ, जानवे, केळी, आंबा, कोणतेही फळ
  • शमी (असल्यास) आघाडा, पत्री, आभरणे ( दागिनी)
  • कापसाची वस्त्रे, १ काडेपेटी
  • गोडाचा नैवेद्य

पूजेची मांडणी

आपले तोंड पुर्वेकडे करुन पाट अथवा चौरंग मांडावा, आपणास बसण्यासाठी पाट अगर आसन / चटई घ्यावी.
पाट पुसून त्यावर थोड्या तांदळाचे मधे किंचीत् खोलगट असे राशीचे वर्तुळ करावे.
तांदळाच्या राशीवर हळदकुंकूवाने स्वास्तिक काढावे व त्यावर अष्टदिशांना हळदीकुंकवाच्या उभ्या रेघा मारलेला जलपुर्ण कलश ठेवावा. त्यात नाणे व सुपारी ठेवावी.
त्या कलशावर आत पांढरे तांदुळ/अक्षता घातलेली वाटी ठेवावी. त्यात दागिना अथवा रुपयाचं नाणं ठेवावं.
तांब्याचे श्रीयंत्र असल्यास तांब्या/कलशाला टेकून ठेवावे आणि श्रीयंत्र नसल्यास त्याचे चित्र (फ्रेमअथवा प्लॉस्टिक कागदात घालुन ठेवावा.) 
कलशाचे उजवे बाजुस शंख ठेवावा आणि  डावे बाजुस घंटा ठेवावा. पाटावर किंवा चौरंगावर उजवे बाजुस
थोडे तांदुळ ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी. सुपारीच्या डाव्या बाजुस दोन देठाची विड्याची पाने ठेवून त्यावर नाणे
आणि  त्यावर सुपारी असा विडा ठेवावा. फुले, दुर्वा, सुगंधी द्रव्ये एका मोठ्या ताटात ठेवावी. पंचामृत तयार ठेवावे.(दूध, दही, तूप,मध, साखर).
समई / निरांजन योग्य ठिकाणी लावून ठेवावी. धुप/उदबत्ती, नीरांजन, कापूर आरती तयार ठेवावी. चौरंगापुढे रांगोळी काढावी, त्यावर हळदीकुंकू घालावे.

पुजा विधी

अंघोळ करावी किंवा हातपाय धुवावे आणि धूतवस्त्र अथवा सोवळे नेसून कपाळी गंध लावावे.
घरातील वडील माणसांना नमस्कार करावा व चौरंगापाशी यावे.
देवीच्या आठही प्रतिमांना वंदन करावे. श्रीयंत्रालाही नमस्कार करावा
आचमन करावे व नंतर समोरील विड्यावर पळीने पाणी घालावे शंख आणि घंटा पुसून घ्या, त्यावर गंध लावून ठेवा.
श्रीगणेशाची (गणपती म्हणून सुपारी ठेवली आहे ते) पुजा करावी. त्याला फुलाने पाणी शिंपडावे, हळदीकुंकू,
जानवे, शेंदूर, गुलाल, बुक्का, लाल/ तांबडी फुले, दुर्वा, शमी वहाव्यात, नीरांजन उदबत्ती ओवाळावी.
गुळाचा खडा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि मनापासून प्रार्थना करावी.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । 
निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषुसर्वदा ।।

आता देवीची पुजा करायची आहे.
लक्ष्मी म्हणून वाटीतील दागिना अगर रुपयाचे नाणे आहे.. त्या लक्ष्मीला श्रीयंत्र अत्यंत प्रिय असल्याने
त्या यंत्राला गंध, तांबडे फुल, पुष्प, अक्षदा इ. वाहून पुजा करावी व नमस्कार करावा.
देवीला आवाहन म्हणून अक्षता वहाव्यात. वाटीत ठेवलेल्या लक्ष्मीची पुजा करावी. फुलाने पाणी शिंपडावे. नंतर विविध फुले,
विशेषत: लाल फुल अक्षदा (अलंकारर्थे) , हळद कुंकू, काजळ, अत्तर, दुर्वा इ. वहावे.
धुप, दीप, निरांजन ओवाळावे. गोडाचा नैवेद्य दाखवावा.
कलशाच्या डाव्या बाजुस नारळ ठेवलेला असेल, त्यावर‌ पळीने पाणी घालावे.
“हे लक्ष्मी माते माझी भक्ती गोड मानून तू आमच्या घरात वास्तव्य कर” अशी हात जोडून प्रार्थना करावी.

हे हि वाचा: सोळा सोमवार व्रत कसे करावे आणि त्याची कथा

वैभव लक्ष्मी श्लोक / लक्ष्मी स्तवन श्लोक (Vaibhav Laxmi Shlok)

लक्ष्मी स्तवनाचा पुढील श्लोक म्हणावा

या रक्ताम्बुजवासिनी विलसिनी चंडांशु तेजस्विनी ।
या रक्ता रुधिराम्बरा हरिसखी या श्री मनोल्हासिनी ॥
या रत्नाकर मन्थनाप्रगटिता विष्णोस्वया गेहिनी ।
सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्यावती ॥

वैभव लक्ष्मी श्लोकाचा अर्थ

लाल कमळात जिचे वास्तव्य आहे. जी सुशोभित (अलंकारीनी) आहे. जी तेजपुंज किरणांनी युक्त आहे.
जी आरक्त वर्णाची असुन जिने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत, जी भगवान श्रीविष्णुंना अतिशय प्रिय आहे,
जी मनाला आंनद देते, जी समुद्रमंथनातून प्रगट झाली आहे, जी श्रीविष्णूंची पत्नी आहे, जी कमळातून जन्मलेली आहे.
व अत्यंत पुजनीय आहे.  हे लक्ष्मीमाते माझे रक्षण कर.

नैवेद्य दाखवावा. (पंचामृत, फळे, खीर).

महालक्ष्मीचे ध्यान (श्लोक म्हणावा व देवीचे रुप डोळ्यांपुढे आणावे)

अक्षस्त्रक् पराशुंगदेषुकुलिशं पद्मं धनुःकुण्डिकां ।
दण्ड शक्तिमसिंच चर्म जलजं घण्टासुराभाजनम् ।
शुलं पाशसुदर्शने च दधती हस्तैःप्रवाल प्रभां ।
सेवे सैरिभमर्दिनोमिह महालक्ष्मी सरोजस्थिताम् ॥

आपली इच्छा पूर्ण होण्याकरिता खालील श्लोक म्हणावेत.

1) देहि सौभाग्यमारोग्य देहि देवि परं सुखम् ।
रुपं देहि जयं देही यशोदेहि व्दिषो जहि ॥

2) विधेही देविकल्याण विधेही परमां श्रियम्।
रुपं देहि जयं देहि यशो देहि व्दिषो जहि ।।

3) विद्यावन्तं यशस्वतं लक्ष्मीवन्त जनं कुरु ।
रुपं देहि जयं देहि यशो देहि व्दिषो जहि ।।

4) पुत्रान्देहि धनं देहि सर्व कामाश्च देहि मे।
रुपं देहि जयं देहि यशो देहि व्दिषो जहि ॥

5) देवि प्रपन्नार्ति हरे प्रसीद, प्रसीद मातर्जगतो ऽ खिलस्य ।
प्रसीद विश्वेश्वरि पावाहि विश्व त्वमीश्वरी देवीचराचरस्य ॥

यांनतर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावा (पुढे दिला आहे).

ॐ महालक्ष्मी च विघ्नहे विष्णुपत्नींच धीमहि ।
तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥

वैभव लक्ष्मी प्रार्थना

ऋणरोगांदि दारिद्रयं पापं च अपमृत्य वः
भयशोक मनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा ।।
श्रीर्वचस्व आयुष्य आरोग्यमाविधाच्छोभ भानं महीपते ।
धनधान्यं पशु बहुपुत्र लाभं शतसंवत्सर दीर्घामायुः ॥

यानंतर महालक्ष्म्यष्टक म्हणावे (खाली दिले आहे)

॥ श्री महालक्ष्म्यष्टकम् ॥
श्री गणेशाय नमः ॥ श्री इंद्र उवाच ॥
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते ।
शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥ १ ॥

नमस्ते गरुडारुढे कोलासुर भयंकरी ।
सर्वपापहरे देवी, महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥ २ ॥

सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी ।
सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥ ३ ॥

सिध्दिबुध्दिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी ।
मंत्रमुर्ते सदा देवी महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥ ४ ॥

आद्यंतरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरि ।
योगजे योगसंभुते महालक्ष्मि नमो ऽस्तुते ॥ ५ ॥

स्थुल सुक्ष्ममहारौद्रे महाशक्ति महोदरे।
महापापहरे देवी महालक्ष्मि नमो ऽस्तुते ॥ ६ ॥

पद्मासनस्थिते देवी परब्रहास्वरुपिणि ।
परमेशि जगन्मातार्महालक्ष्मि नमो ऽस्तुते ॥ ७ ॥

श्वेतांबरधरे देवी नानालंकार भुषिते ।
जगत्स्थिते जगन्मातार्महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥ ८ ॥

महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रय: पठेद् भक्तिमान्नरः ।
सर्वसिध्दीमवाप्नोति राज्यं प्राप्तेति सर्वदा ।। ९ ।।

एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम् ।
व्दिकालं यः पुठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः ।। १० ।।

त्रिकालं य: पठेन्नित्यं महाशत्रुंविनाशनम् ।
महालक्ष्मिर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥ ११ ।।

।। इतिंद्रकृतः श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवःसंपुर्ण: ॥

श्रीलक्ष्मीची कथा वाचावी. नंतर गणपतीची आरती व नंतर देवीची आरती करावी.आरतीपूर्वी महानैवेद्य दाखवावा. (आरती देवीची पुढे दिली आहे.) श्रीगणपती आरती म्हटल्यावर पुढीलपैकी कोणतीही एक आरती म्हणावी दोन्ही म्हटल्या तरी चालतील.

वैभव लक्ष्मी देवीची आरती

देवीची आरती – 1

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी। अनाथ नाथे अंबे करुणाविस्तारी।
वारी वारी जन्ममरणाते वारी। हारी पडली आता संकट निवारी ॥ १॥

जय देवी जय देवी जय महिषासरमथिनी ।
सुरवर ईश्वरवरदे तारक संजिवनी ॥ जय ॥ धृ ॥

त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसी नाही।
चारी श्रमले परंतु आता न बोलवे काही।
साही विवाद करिता पडले प्रवाही ।
ते तू भक्तांलागी पावसी लवलाही ॥ २ ॥ जय ।।

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशा पासुनि सोडी तोडी भवपाशा ।।
अंबे तुजवाचुन कोण पुरविला आशा।
नरहरि तल्लीन झाला पदपंकज लेशा ॥ जय ॥ ३ ॥

महालक्ष्मी देवीची आरती – 2

जय देवी जय देवी महालक्ष्मी ॥
वससी व्यापकरुपें तूं स्थूलसुक्ष्मी ॥ धृ ॥

करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ॥
पुर हरवरदायिनी मुरहरप्रियकांता ॥
कमलाकरें जठरी जन्मविला धाता ॥
सहस्त्रवदनीं भूधर न पुरे गुण गातां ॥ जय देवी ॥ १ ॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं ॥
झळके हाटकवाटी पीयूषरसपाणी ॥
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी ॥
शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥ जय देवी ॥ २ ॥

तारा शक्ति अगम्या शिवभजका गौरी ॥
सांख्य म्हणती प्रकृति निर्गुण निर्धारीं ॥
गायत्री निजबीजा निगमागम सारी ।।
प्रगटे पद्मवती निजधर्माचारी ॥ जय देवी ॥ ३ ॥

अमृत भरिते सरिते अद्यदुरिते चारीं ॥
मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं ।।
वारी मायापटल प्रणमत परिवारीं ॥
हे रुप चिद्रुप तद्रुप दावी निर्धारी ॥ जय देवी ॥ ४ ॥

चतुरानने कुश्चितकर्माच्या ओळी ॥
लिहिल्या असतील माते माझे निजभाळीं ॥
पुसोनि चरणांतळीं, पदसुमनें क्षाळीं ॥
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ जय देवी ॥

वरील आरती झाल्यानंतर हात जोडून पुढील श्लोक तीन वेळा म्हणावा

पत्राभ्यागवदानमान चरणं प्रक्षालनं भोजनम् ।
सत्सेवा पितृदेववार्चन विधीः सत्यंगवां पालनम् ॥
धान्या नामपि संग्रहो न कलहश्चित्ता तृरुपा प्रिया ।
दृष्टा प्रहा हरि वसामि कमला तस्मिन गृहे निश्चला ॥
श्लोकाचा अर्थ:-

जेथे अतिथीचे स्वागत करुन त्यांना भोजन दिले जाते. तेथे पितृ व देव यांची सश्रध्देने पूजा केली जाते.
जेथे सत्य व गाईचे रक्षण केले जाते. जेथे धान्यसंग्रह दानासाठीच केला जातो. जेथे गृहिणी तृप्त, विनयी, संतृष्ट आहे.
अशा ठिकाणी माझा(भगवंतासह) निश्चल वास असतो. (ते ठिकाणी घर सोडून मी अन्यत्र जात नाही)

पुजा पुर्ण झाल्यावर प्रसाद- भोजन घ्यावे.

श्री वैभव लक्ष्मी व्रत कथा (Vaibhav Laxmi Vrat Katha)

आटपाट नगर होते. तेथील लोक शेजाऱ्यांशी प्रेमाने वागत बोलत होते, गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते;
पण काळ आता बदलला होता. त्यामुळे नामस्मरण, भजन, कीर्तन, परोपकार, माया-ममता, सेवा
या सत्प्रवृत्तींच्या गोष्टी याला जाऊन चोरी, दरोडा, जुगार, सट्टा, मद्यपान, व्यभिचार अशा वाईट गोष्टीच वाढल्या होत्या.
अर्थात सर्वच माणसे काही दुराचारी नव्हती. नगरात काही चांगली माणसेही होती. त्याच गावात शीला व तिचा पतीही रहात होते.
दोघेही धार्मिक, सत्प्रवृत्त, शांत, सुखी व संतुष्ट होते.

शीला संसारात सुखी होती. पण काळाला ते मान्य नसावे.

तिच्या भाग्यात भोगही लिहिलेले होते. तिच्या नवऱ्याला वाईट मित्रांची संगत लागली. आपणही एका रात्रीत कोट्याधीश व्हावे
अशी स्वप्ने तो पाहू लागला. त्यासाठी नको त्या व्यवसायात पडून तो कोट्याधीशा ऐवजी भिक्षाधीश झाला.
रस्त्यावर भीक मागण्याची पाळी त्याच्यावर आली.

अफू, चरस, गांजा यांना तो बळी पडला. दुराचारी मित्रांच्या सहवासाने तो सट्टा, रेस, जुगार खेळू लागला.
त्यात त्याने स्वतःजवळच्या सर्व पैशांबरोबर शीलाचे दागिनेही घालावले.

शीला सुसंकृत, सुशील आणि सुस्वभावी स्त्री होती. तिला आपल्या नवऱ्याच्या वागणुकीचे वाईट वाटत होते.
‘दुःखानंतर सुख येतेच’ हा सिद्धांत तिला माहीत असल्यामुळे हे सगळे हाल सहन करतानाही परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून
ती ईश्वरभक्ती करीत होती.

एके दिवशी दुपारी ती घरी विचार करीत बसली होती. त्या वेळी तिच्या दारी एक अतिथी आला.
दारिद्र्य व दुःखाने ओतप्रोत भरलेल्या आपल्या घरी कोण आले असेल बरे? असा प्रश्न तिच्या मनात आला;
पण घरी आलेल्या अतिथीस किमान चहा पाणी तरी द्यावे, हा संस्कार बालपणीच तिच्यावर ठसला असल्याने ती अतिथीच्या स्वागतास उठली.

ती पाणी घेऊन अतिथीला देण्यासाठी दरवाजात आली. अतिथी म्हणजे एक वृद्धा माता होती; तरीही तिचा चेहरा तेजपुंज होता.
डोळ्यांतून अमृत, तर चेहऱ्यावर प्रेम ओसंडून वहात होते. माता भेटल्याचा आनंद तिला झाला. शीला मातेला ओळखत नव्हती.
तरीदेखील त्या मातेला पहाताच तिला प्रसन्न वाटले. तिने मातेचे स्वागत करून, तिला घरात घेतले. घरातील एकमात्र पाट
तिने मातेला बसावयाला दिला.

मातेने शीलाला विचारले, “मला ओळखलेस का?” शीला संकोचली. ती म्हणाली, “माते, मी तुला ओळखले नाही;
परंतु तुला पाहून मला खूप आनंद झाला आहे. मन शांत , प्रसन्न  झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या
साऱ्या चिंतांतून मुक्त झाल्यासारखे वाटते आहे. तुम्ही आलात व मला फार मोठा आधार लाभल्यासारखे वाटू लागले”.

 माता हसली. मग म्हणाली, “तू मला विसरलीस की काय? लक्ष्मी मातेच्या मंदिरात दर शुक्रवारी होणाऱ्या भजनाला आपली भेट होत असते, आठवत नाही का तुला?”

नवऱ्याच्या दुराचारी वर्तनामुळे शीला खचली होती. बाहेरच्या लोकांना तोंड दाखवायची तिला लाज वाटायची.
म्हणून तिने गेल्या काही दिवसांपासून मंदिरात जाणेही बंद केले होते. मातेने जरी सांगितले असले,
तरी तिला काही या मातेला मंदिरात पाहिल्याचे आठवत नव्हते.

तिची संभ्रमीत मुद्रा पाहून माताच पुढे म्हणाली, “तू लक्ष्मी मातेच्या मंदिरात नेहमी सुंदर भजन म्हणतेस;
पण अलीकडे तू मला दिसलीच नाहीस. म्हणून तुला शोधत – शोधत मी इथे आले. मला वाटलं,
की तू आजारी असल्यामुळं येत नसशील. कशी आहेस तू ?”

आईच्या मायेने प्रेमळपणे विचारपूस केल्यामुळे शीलाचे मन हेलावले. नकळत तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.
मातेने ते पाहिले. तिच्या जवळ जाऊन, तिच्या पाठीवरून ममतेने हात फिरवीत, माता तिला म्हणाली,
“बाळ, सुख व दुःख हा ऊन-सावलीचा खेळ आहे. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे जीवनाचे कालचक्र ठरलेलेच आहे;
पण दु:खात बिलकूल धीर सोडू नये. तुझे दुःख मला सांग. मन मोकळे केल्याने दुःख हलके होईल.
शक्य असेल तर एखादा उपाय मी सुचवेन.”

मातेच्या बोलण्याने तिला बराच धीर आला. ती मातेला म्हणाली, “माते, पूर्वी माझ्या संसारात आनंद आणि सुख होते.
माझे पती सुशील आणि सुस्वभावी असल्याने देवाची सेवा आम्ही कधी विसरलो नाही. देवकृपेने
आम्ही सुखी, समाधानी आणि श्रीमंत होतो; परंतु अचानक आमचे नशीब फिरले. आमच्यावर दैवाचा कोप झाला.
माझे पती कुविचारी मित्रांच्या नादाने व्यसनाधीन झाले. पर्यायाने आमचा सर्वनाशझाला. आम्ही भिकारी झालो गं !”

माता म्हणाली, “असं होय, समजले मला तुझे दुःख. तुला अगोदरच सांगितलं ना, सुख व दुःख एकमेकांवर अवलंबून असतात.
प्रत्येकाच्या कर्माची गती वेगवेगळी असते. तू धीर सोडू नकोस. लक्ष्मी मातेचे व्रत कर.
लक्ष्मी माता प्रेम, दया, करुणा, कृपा यांचा अवतार आहे. ती भक्ताच्या दुःखाचे निवारण करते. तिचे व्रत केले तर चांगलंच होईल.”

मातेचे बोलणे ऐकून शीलाचा चेहरा खुलला. ती म्हणाली, “माते, हे व्रत करण्याची मला मनापासून इच्छा आहे;
तरी तू कृपा करून हे व्रत कसे करावे ते सांग.” शीलाच्या या बोलण्यामुळे मातेलाही खूप आनंद झाला. ती म्हणाली,

“या व्रताला ‘वरदलक्ष्मी व्रत’ तसेच ‘श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत’ असेही म्हणतात. मनापासून हे व्रत करणाऱ्याच्या सर्व इच्छा,
अपेक्षा पूर्ण होतात. संतती, संपत्ती व सुख-समाधान लाभते. हे व्रत अगदी सोपे आहे.
हे व्रत चुकीच्या पद्धतीने करणाऱ्या लोकांना व्रताचे फळ मिळत नाही.
व्रताचे फळ मिळण्यासाठी ते नेहमी शास्त्रशुद्ध आणि विधिपूर्वकच करावे लागते.
सोन्याच्या दागिन्यांची पूजा विधिपूर्वक करावी लागते. नुसते दागिन्यांना हळद-कुंकू लावल्याने जर कोट्याधीश होता आले,
तर साऱ्यांनीच हळद-कुंकू समर्पणाचा मार्ग धरला असता.”

“हे व्रत प्रत्येक शुक्रवारी करावे. व्रत करणाऱ्याने सकाळी उठून स्नान करावे. स्वच्छ कपडे घालावे.
स्नानानंतर अंथरूण, पादत्राणे, झाडू इत्यादी वस्तूंना स्पर्श करू नये. कोणाची निंदा करू नये.
मनामध्ये ‘जय श्री वैभव लक्ष्मी माता’ असा जप सतत करत रहावा. खोटे बोलू नये. सायंकाळी दिवाबत्ती करावी.
देवापुढे नंदादीप लावावा. हात-पाय स्वच्छ

धुऊन एका पाटावर पूर्वेकडे तोंड करून बसावे. आपल्यासमोर आणखी एक स्वच्छ पाट ठेवावा.
त्या पाटावर नवा कोरा लाल रुमाल अंथरावा. रुमालावर तांदळाची छोटीशी रास काढावी. त्या राशीवर तांब्याचा गडवा

(तांब्या) पाण्याने भरून ठेवावा. गडव्यावर एका वाटीमध्ये थोडे तांदूळ घालून सोन्याचा एखादा दागिना ठेवावा.
तो दागिना नसेल तर चांदीचा दागिना किंवा वस्तू ठेवावी. चांदीची एखादी वस्तूही नसेल तर एक रुपयाचे नाणे ठेवावे.
त्यानंतर उदबत्ती व निरांजन लावावे.

जय लक्ष्मी माता ही ‘श्रीयंत्राने’ च प्रसिद्ध होते.‌ म्हणून वैभव लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत करताना
प्रथम श्री यंत्राचे आणि मातेच्या विविध स्वरूपांतील फोटोंचे मनोभावे दर्शन घ्यावे.
त्यानंतर हात जोडून लक्ष्मीचे स्तवनपर श्लोक म्हणावा.

वाटीतील दागिन्यांची हळद-कुंकू लावून, लाल फुले वाहून पूजा करावी. घरात गोड पदार्थ बनवून तो प्रसाद म्हणून ठेवावा.
गोड पदार्थ बनविला नसेल तर साखर, गूळ, खडीसाखर यांपैकी काहीही चालते. नंतर आरती करावी.
आरतीनंतर ११ वेळा मनःपूर्वक ‘जय श्री लक्ष्मी माता’ असा जप करावा. त्यानंतर आलेल्या भक्तांना प्रसाद वाटावा.

वाटीतील दागिना अथवा रुपया काढून घ्यावा, गडव्यातील पाणी तुळशीत ओतावे. विधीत वापरलेले तांदूळ पक्ष्यांना टाकावेत.
मातेचे व्रत अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास निश्चित यश मिळते. या व्रतामुळे दुःख, हालअपेष्टा संपतात. संपत्ती, संतती प्राप्त होते.
त्याचप्रमाणे सौभाग्यवर्तीचे सौभाग्य अखंड राहते. कुमारिकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
मातेने सांगितलेल्या व्रताची शास्त्रशुद्ध पद्धत ऐकून शीलाला आनंद झाला. ती मातेला म्हणाली,
“माते, तू सांगितलेले हे व्रत मी याच पद्धतीने करेन; परंतु हे व्रत किती वेळा करावे ? या व्रताचे उद्यापन कसे करावे ? हे ऐकण्यास मी उत्सुक आहे, तरी कृपा करून तू मला ते सांग.”

मातेला शीलाचे कौतुक वाटले. ती सांगू लागली, “व्रत चुकीच्या पद्धतीने आणि कसेही करण्यात काहीच अर्थ नसतो.
हे व्रत अकरा किंवा एकवीस शुक्रवारी ओळीने करावे. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी उद्यापनदेखील शास्त्रोक्त पद्धतीनेच करावे.

प्रत्येक शुक्रवारी आपण जशी पूजा करतो, तशीच पूजा शेवटच्या शुक्रवारी करावी.
उद्यापनाच्या दिवशी साखरभात किंवा खीर यांसारखा गोड पदार्थ प्रसादासाठी करावा.
नंतर प्रसादाबरोबरच ७ किंवा ११ सुवासिनींना वा कुमारिकांना हळद-कुंकू लावून श्री वैभवलक्ष्मी माता व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून द्यावी.

सर्वांत शेवटी श्री लक्ष्मी मातेच्या फोटोला वंदन करून, ‘हे माते, मी मनःपूर्वक तुझे व्रत केले आहे. आम्हा सर्वांचे कल्याण कर.
माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर. गरिबांना संपत्ती, निपुत्रिकांना पुत्र दे. सौभाग्याचे कायम रक्षण कर. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर.
हे व्रत करणाऱ्या सर्वांना सुखी व समाधानी ठेव’ अशी मनोभावे प्रार्थना करावी.
त्यानंतर पुन्हा एकदा मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला श्रद्धापूर्वक नमस्कार करून मातेचा आशीर्वाद घ्यावा.

मातेच्या तोंडून लक्ष्मी मातेच्या व्रताची कथा ऐकल्यानंतर क्षणभर शीलाने डोळे मिटले आणि मनामध्ये
‘मातेने सांगितल्याप्रमाणे मी लक्ष्मी मातेचे शास्त्रोक्त पद्धतीने एकवीस शुक्रवार व्रत आणि यथासांग उद्यापनही करेन’ असा निश्चय केला.
या निश्चयानंतर तिने जेव्हा डोळे उघडले, तेव्हा समोर माता नव्हती.

तिला आश्चर्य वाटले. तिने आजूबाजूला शोध घेतला, पण तिला माता दिसली नाही.
त्यामुळे ती माता खरोखर लक्ष्मीमाताच होती याबद्दल शीलाची खात्री झाली.
शीला स्वत: लक्ष्मीमातेची भक्त असल्यामुळे अडचणीच्या प्रसंगी तिला मार्ग दाखवायला माता समक्ष आली होती.

दोन दिवसांनंतर शुक्रवार आला. शीला सकाळी लवकर उठली.अंघोळ केली; मग तिने श्रद्धायुक्त अंतःकरणाने
‘जय श्री लक्ष्मी माता’ असा जप सुरू केला. तिने दिवसभर कोणाविषयी अपशब्द उच्चारला नाही.
सूर्यास्तसमयी दिवेलागण झाल्यावर तिने पुन्हा एकदा हात-पाय, तोंड स्वच्छ धुतले. त्यानंतर ती पूर्वेकडे तोंड करून बसली.
घरात कोणताच दागिना शिल्लक नसल्यामुळे एक रुपयाचे नाणे धुऊन तिने वाटीत ठेवले.
समोर एक पाट ठेवला. त्यावर रुमाल अंथरला. रुमालावर तांदळाची छोटी रास केली. त्यावर पाण्याचा गडवा ठेवला.
गडव्यावर तांदूळ व एक रुपयाचे नाणे घातलेली वाटी ठेवली.

मातेने सांगितल्याप्रमाणे श्री लक्ष्मीमातेचे व्रत केले. घरातील गुळाचा खडा प्रसाद म्हणून ठेवला,
नवरा घरी आल्यानंतर तिने हा प्रसाद त्याला दिला. ताबडतोब त्याच्या स्वभावात फरक पडला.
त्या दिवसापासून लगेचच त्याने शीलाला मारहाण करण्याचे थांबविले. तो पूर्ववत तिच्याशी प्रेमाने बोलू लागला.
याचाच तिला अत्यानंद झाला. श्रद्धेबरोबरच शुद्ध भक्तिभावाने शीलाने लक्ष्मी मातेचे हे व्रत एकवीस शुक्रवारपर्यंत केले.
शेवटच्या एकविसाव्या शुक्रवारी मातेने सांगितल्याप्रमाणे उद्यापन केले.

त्या प्रसंगी प्रसादाबरोबर सात सुवासिनींना तिने लक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची माहिती पुरवली.
त्यानंतर धनलक्ष्मी स्वरूपातील मातेच्या फोटोला वंदन केले आणि मनोभावे म्हटले,

“हे धनलक्ष्मी माते, मी तुझे व्रत भक्तिभावाने पूर्ण केले आहे. आता तू आम्हा सर्वांचे कल्याण कर.
माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर. गरिबांना संपत्ती आणि निपुत्रिकांना संतती दे. सौभाग्यवतींचे सौभाग्य अखंड ठेव.
कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणाऱ्या सर्वांना सुखी ठेव. आम्हा सर्वांना सत्त्वशील बनव.” अशी तिने मनःपूर्वक प्रार्थना केली.
या प्रार्थनेनंतर तिने परत एकदा धनलक्ष्मी मातेला वंदन करून तिचा फोटो आपल्या डोळ्यांना लावला.

अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने शीलाने व्रत केल्यामुळे तिला ताबडतोब त्याचे फळ मिळाले. तिच्या नवऱ्याच्या वर्तनात बदल झाला.
कुविचारी मित्रांची संगत त्याने सोडली. त्याच्या राहाण्यात – वागण्यात – बोलण्यात फरक पडला. तो सुधारला.
पुन्हा पहिल्यासारखा भरपूर कामधंदा करू लागला. त्याला अपेक्षेपेक्षाही अधिक पैसा मिळू लागला.
तो शीलाचे गहाण ठेवलेले दागिने सोडवू शकला. या व्रतामुळे त्यांच्या घरात पूर्वीसारखेच सुख, समाधान, शांती निर्माण झाली.
शीलाचे दारिद्र्य गेले, तिचा नवरा सुधारला, गेलेले वैभव परत ती मिळवू शकली.

हे तिच्या शेजारीपाजारी रहाणाऱ्या स्त्रिया पहात होत्या. त्यांनीही हे व्रत करण्याची आपली इच्छा शीलाला सांगितले.
शीलानेही सर्व व्रतविधी सांगितला. व्रत समजावून घेऊन त्यांनीही हे व्रत सुरू केले.

हे लक्ष्मी माते, सर्वांना शीलाप्रमाणे फळ दे. सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. तुझा त्रिवार जयजयकार असो !

श्री लक्ष्मीकवच

अथ वक्ष्ये महेशानि कवचं सर्वकामदम् । यस्य विज्ञानमात्रेण

भवेत्साक्षात्सदाशिवः || १ ||
नार्चनं तस्य देवोही मन्त्रमात्रं जपेन्नरः । सभवेत्पार्वतीपुत्रः सर्वशास्त्र पुरस्कृतः ||२||
विद्यार्थिनां सदा सेव्या धनदात्री विशेषतः । धनार्थिभिः सदा सेवा कमळा विष्णुवल्लभा || ३ ||

 पराशरमुनिकृत पुत्रप्राप्तिकर महालक्ष्मी स्तोत्रम्

अनाद्यन्तरुपां त्वां जननीं देहिनाम् । श्रीविष्णुरुपिणीं वंदे महालक्ष्मी परमेश्वरीम् ॥ १ ॥
नामजात्यादिरूपेण स्थितां त्वां परमेश्वरीम् । श्रीविष्णुरुपिणीं वंदे महालक्ष्मीं परमेश्वरीम् ॥२॥
व्यक्ताव्यक्त स्वरूपेण कृत्रनं व्याप्य व्यवस्थिताम् । श्रीविष्णुरुपिणीं वंदे महालक्ष्मी परमेश्वरीम् ॥३॥
भक्तानंदश्रद्धां पूर्णापूर्ण काम करी पराम्। श्रीविष्णुरुपिणीं वंदे महालक्ष्मीं परमेश्वरीम् ।। ४ ।।
अंतर्याम्यात्मना विश्वमापूर्य हट्टिसंस्थिताम् । श्रीविष्णुरुपिणीं वंदे महालक्ष्मी परमेश्वरीम् ॥५॥
सर्वदैत्य विनाशार्थ लक्ष्मीरुपां व्यवस्थिताम् । श्रीविष्णुरुपिणीं वंदे महालक्ष्मीं परमेश्वरीम् ॥६॥
भुक्तिमुक्तिंच दातुं संस्थिता करवीरके। श्रीविष्णुरुपिणीं वंदे महालक्ष्मीं परमेश्वरीम् ॥ ७ ॥
सर्वाभयप्रदां देवीं सर्वसंशयनाशिनीम् । श्रीविष्णुरुपिणीं वंदे महालक्ष्मीं परमेश्वरीम् ॥८॥

॥ इति श्रीकरवीरमाहात्म्ये पाराशरकृतं पुत्रप्राप्तिकरं महालक्ष्मीस्तोत्रं संपूर्णम् ॥
हे हि वाचा: श्री महालक्ष्मी व्रत कथा मराठी – मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा

विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions

वैभव लक्ष्मी व्रत कधी करावे?

शुक्रवारीच  हे व्रत करण्यास सुरवात करावी. आपण 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार हे व्रत करणार आहे हे मनाशी संकल्प करुन ठेवावे. 21 पेक्षाही जास्त शुक्रवार करता येईल . उद्यापनानंतर  पुन्हा संकल्प करुन वैभव लक्ष्मीचे व्रत करता येते. अधिकमासात व्रताची सुरुवात किंवा उद्यापन सुरू करू नये. कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील शुक्रवारपासून वैभव लक्ष्मी व्रत सुरू करणे शुभ मानले जाते. पण अधिकमास उपवास किंवा उद्यान सुरू करू नये.

वैभव लक्ष्मी व्रत सुरू केल्यानंतर बाहेरगावी जावे लागले तर?

व्रत सुरू केल्यानंतर  नेमके शुक्रवारी बाहेरगावी जावे लागले, प्रवास करणे गरजेचे असल्यास तो शुक्रवार सोडून द्यावा. त्या दिवशी मनापासून नामस्मरण करावे व पुढील शुक्रवारी व्रत करावे. आपण एकूण जेवढ्या शुक्रवारी पुजेचा संकल्प केला आहे तेवढे मात्र पुर्ण करावेत.

वैभव लक्ष्मी व्रताच्या दिवशी शुक्रवारी मासिक पाळीची अडचण स्त्रियांचे बाबतीत आल्यास काय करावे?

व्रताच्या दिवशी शुक्रवारी मासिक पाळीची अडचण स्त्रियांचे बाबतीत आल्यास तो शुक्रवार सोडून द्यावा व नंतरचे शुक्रवारी व्रत करावे. संकल्प केलेल्या शुक्रवाराची संख्या पुरी करावी.

वैभव लक्ष्मी व्रत सुरु केल्यानंतर सुतक आल्यास काय करावे?

व्रत सुरू असताना सुतक असल्यास व्रत करु नये. सुतक संपल्यानंतरच्या शुक्रवारी व्रत करावे. संकल्प  केलेली व्रताची संख्या लक्षात ठेवावी.

वैभव लक्ष्मी व्रताच्या उपवास करताना काय खावे?

वैभव लक्ष्मी व्रत करताना व्रताच्या दिवशी म्हणजेजच शुक्रवारी उपवास करावा. हा उपवास करताना उपाशी राहु नये, उपवासचे पदार्थ खावे किंवा केळी, दुध इ. फलाहार करावा. संध्याकाळच्या यावेळी पूजा झाल्यांनतर उपवास सोडावा.

वैभव लक्ष्मी व्रताच्या वेळी मीठ खावे की नाही?

वैभव लक्ष्मी व्रतात मिठाचा उपयोग करू नये. तब्येतीची किंवा शारीरिक समस्या असल्यास सैंधव मिठाचा उपयोग करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *