अक्षय्यतृतीया (वैशाख शुद्ध तृतीया) (परशुराम जयंती)
वैशाख शुद्ध तृतीयेस ‘अक्षय्यतृतीया’ असेही म्हणतात. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे असे मानतात. या दिवशी स्नान, दान, होम, जप व पितरांचे तर्पण वगैरे जे काही केले जाते, ते अक्षय्य टिकते असे शास्त्रात सांगितले आहे.
कधी आहे अक्षय्य तृतीया?
अक्षय्यतृतीया तिथी |
|
तारीख: | 21 एप्रिल 2023 |
वार: | गुरुवार |
तिथीची सुरवात: | 21 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11:00 पासुन. |
तिथीची समाप्ती: | 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 09:26 पर्यंत. |
अक्षय तृतीया या दिवसाबद्दल भविष्योत्तर पुराणात कथा आहे ती पुढीलप्रमाणे
धर्म नावाचा वाणी:
शाकल शहरात धर्म या नावाचा एक वाणी राहात असे. तो सत्यनिष्ठ व प्रियभाषी असून देव व ब्राह्मण यांची नित्य पूजा करीत असे. एके दिवशी त्याच्या कानावर अक्षय्यतृतीयेचे माहात्म्य पडले. ते ऐकल्यावर त्याने नदीत स्नान केले व पितर आणि देवता यांचे तर्पण केले आणि घरी येऊन उदकाने भरलेले घट व दक्षिणा ब्राह्मणांस दिली. असा त्याचा क्रम दरवर्षी सुरू होता. पुढे काही काळाने तो ईश्वराचे स्मरण करीत मरण पावला. पुढच्या जन्मी त्याला मागील पुण्याच्या योगाने राज्यपद मिळाल्यावरही त्याने पूर्वीचाच क्रम ठेवला होता. जरी तो इतका दानधर्म करीत असे तरी त्याचा पैसा कधीच कमी झाला नाही. याचे कारण त्याने अक्षय्यतृतीयेस पुष्कळ दानधर्म केला होता व त्याचेच हे फल होते.
तिथी परशुरामजन्माची
ही तिथी परशुरामजन्माची आहे. धार्मिक विधी: बुधवार व रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय्यतृतीयेस येईल, ती सर्वांत उत्तम होय असे शास्त्रवचन आहे. या दिवशी ग्रीष्म ऋतुमध्ये होणाऱ्या सर्व धान्यांचे दान करावे. छत्री, जोडे, गाय, सुवर्ण व वस्त्रे तसेच, स्वच्छ व थंडगार पाण्याने भरलेले कलश यांचेही यथाशक्ती दान करावे. जे आपणास अत्यंत प्रिय असेल, तेही दान करावे. त्याचप्रमाणे पितरांच्या नावाने थंड पाण्याने भरलेले उदककुंभ दान ब्राह्मणांस द्यावे असे सांगितले आहे. वास्तविक हा दिवस श्राद्धदिनच आहे; परंतु काही ठिकाणी हा सण आहे असे मानतात.
रुढी:
या दिवशी सकाळी स्नान करून सर्व कामे आटोपावीत व दुपारी पितरांकरता ब्राह्मणांस कुंभदान द्यावे. स्त्रियांनी श्रीविष्णूची पूजा करावी. मग ब्राह्मणांस दान द्यावे. तो – देशावर या सणाचे महत्त्व विशेष आहे. त्या दिवशी नानाप्रकारचे पदार्थ करून सण साजरा करण्याची चाल आहे. चैत्र शुद्ध तृतीयेपासून गौरीउत्सव सुरू होतो. तो या दिवशी समाप्त होतो. या कारणाने सर्व स्त्री समाज एकमेकांच्या घरी जाऊन हळदी-कुंकू घेताना दिसतो. या दिवसापासून लोक पाणी थंड करून पिण्यास प्रारंभ करतात. अगोदर गार पाणी प्याले, तर ते त्रासदायक होते. यासाठी आमच्या पूर्वजांनी पितरांना गार पाणी दिल्याशिवाय आपण गार पाणी पिऊ नये, असा निर्बंध घालून ठेवला आहे; परंतु सांप्रत काळी त्या गोष्टीचे स्मरण आम्हांला राहिले नाही हे आमचे दुर्दैव होय.
अक्षय तृतीया नावाचा अर्थ काय? Meaning of Akshay Tritiya
अक्षय तृतीया यात अक्षय म्हणजे कधी न संपणारे, निरंतर असे इथे याचा अर्थ संप्पती आणि भरभराट या संबधी आहे. आणि तृतीया म्हणजे चंद्राची तिसरी कला. हिंदू कॅलेंडरमध्ये वैशाखच्या वसंत ऋतु महिन्याच्या तिसऱ्या चंद्र तिथी वरून हे नाव देण्यात आले आहे, जेव्हा तो साजरा केला जातो. हा दिवस हिंदी आणि त्याच प्रमाणे जैन धर्मत शुभ दिवस म्हणून साजरा केला जातो.