आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी )
आषाढी एकादशीस ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. कारण या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करतात असे म्हणतात, तर कार्तिकी एकादशीस ते जागे होतात.
आषाढी एकादशी तिथी |
|
तारीख: | 29 जून 2023 |
वार: | गुरुवार |
तिथीची सुरवात: | 29 जून 2023 रोजी पहाटे 03:18 पासुन. |
तिथीची समाप्ती: | 30 जून 2023 रोजी पहाटे 02:42 पर्यंत. |
महाएकादशीची गोष्ट
आषाढ शुद्ध एकादशीला ‘ पहिली महाएकादशी’ असे म्हणतात. मृदुमान्य दैत्याने तपश्चर्या करून शंकरास प्रसन्न करून घेतले, तेव्हा त्या दैत्याच्या इच्छेप्रमाणे ‘ तुला कुणाही पुरुषाच्या हातून मृत्यु येणार नाही,’ असा शंकराने त्याला वर दिला. तो वर मिळाल्यामुळे उन्मत्त झालेला मृदुमान्य देवलोकावर चालून गेला व देवांचा नाना त-हांनी छळ करू लागला. शेवटी शेवटी तर तो ब्रह्मा व विष्णूच नव्हे, तर आपल्याला वर देणाऱ्या शंकरालाही मारण्यासाठी त्याचा पाठलाग करू लागला. कुणाही पुरुषाच्या हातून मृदुमान्याला मृत्यु येण्याची शक्यता नसल्याने, कुणीच देव त्याचे पारिपत्य करू शकेना !
तेव्हा ‘महाएकादशी’ नावाची एक शक्तिशाली देवी प्रकट झाली व तिने आपल्या हातातल्या तळपत्या तरवारीने त्या दैत्याचे मुंडके छाटून, त्रैलोक्याची त्यांच्या भयातून मुक्तता केली. तेव्हा सर्व देव व मानव हात जोडून तिला म्हणाले, “ हे देवी, आम्ही तुझे उपकार कसे फेडावे ? देवी म्हणाली, “ मला काहीही नको, पण आज मी त्रैलोक्याला भयमुक्त केले ना ? तेव्हा यापुढे प्रत्येक महिन्यातील शुद्ध व वद्य एकादशीला उपवास करा आणि दिवसातील काही वेळ तरी भगवंताच्या चिंतनात घालवा. एवढे नाहीच जमले तर आषाढ शुद्ध एकादशी व कार्तिक शुद्ध एकादशी या दोन तिथींना महाएकादशा समजून व दिवसभर उपवास करून भगवंताचे चिंतन करा ! ”
भाविकांच्या दिंड्या / भजन
या आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून देवपूजा करावी. ‘विष्णूसहस्रनाम’ व ‘ज्ञानदेवांचा हरिपाठ’ यांचे मोठ्याने वाचन करावे. पूजेच्या वेळी श्रीविष्णूला १००८ तुलसीपत्रे वाहावीत. (निदान १०८ तरी वाहावीत.) रात्रौ भजन व नामस्मरण करावे. दिवसा झोपू नये. दुसरे दिवशी सूर्योदय झाल्यावर पारणे सोडावे. या आषाढ शुद्ध एकादशीप्रमाणेच कार्तिक शुद्ध एकादशीही महत्त्वाची समजली जाते. या दिवशीही वरीलप्रमाणेच उपवास व भजन पूजन करावे. एकादशीचे व्रत करणारा सर्व पातकांपासून मुक्त होतो असे स्वतः एकादशी देवीनेच सर्व देवांना सांगितले आहे.