गुरुपोर्णिमेवर भाषण
वंदनीय गुरुजन आणि माझ्या बंधु-भगिनींनो, आज गुरुपौर्णिमा.
महान तपस्वी, ज्ञानी व प्रतिभासंपन्न असे महाभारतकार महर्षि व्यास यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या गुरुपौर्णिमेला ‘ व्यास-पौर्णिमा’ असेही म्हटले जाते. वर्षभर आपण विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेत येतो, पाच-सहा तास गुरुजींकडून ज्ञान घेतो, पण त्याबद्दल त्यांच्यापाशी कधीच कृतज्ञता व्यक्त न करता, शाळा सुटल्याची घंटा वाजताच घरी पळ काढतो. म्हणून आमच्या शास्त्रकारांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्हाला आमच्या गुरुजनांबद्दल वाटणारा आदर व पूज्यभाव व्यक्त करण्याची सुवर्णसंधी दिली आहे. अर्थात् हा आदर व पूज्यभाव वर्षातून केवळ एकदा गुरुपौर्णिमेलाच किंवा फार फार तर शाळेत शिकत असेपर्यंतच व्यक्त करायचा नसतो, तर तो शालेय शिक्षण पूर्ण करून, शाळा सोडून गेल्यावर, पुढल्या आयुष्यातही व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
आमच्या भारतीय संस्कृतीत ‘गुरूं ‘ना अतिशय मानाचे स्थान दिले गेले आहे. कारण नूसते चर्मचक्षू असलेला माणूस, डोळे असूनही आंधळा असतो. ज्याला ज्ञानचक्षूचा – म्हणजेच विद्येचा – लाभ होतो, तोच माणूस खऱ्या अर्थी डोळस होतो व स्वतःच्या जीवनाची वाटचाल यशस्वीपणे करू शकतो. हा ज्ञानचक्षू आपल्याला गुरू देतात. आपल्या डोळ्यांवरचा अज्ञानाचा पडदा दूर करून, ते आपल्या जीवनरूपी रथाला कल्याणाचा मार्ग दाखवितात. म्हणून संत ज्ञानेश्वरमहाराज म्हणाले –
आयुष्याची पेठ । संसाराचे तट । गुरुवीण वाट कैची रथा।
आपल्या देशात, सांदीपनी-श्रीकृष्ण, समर्थ-शिवप्रभू, रामकृष्ण परमहंस-विवेकानंद, अशी थोर गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. त्यामुळेच आपल्याला अत्यंत आदरणीय व प्रिय असलेल्या आई-वडिलांच्या पंक्तीत आपण गुरुंनाही बसवतो व म्हणतो –
मातृदेवो भव । पितृदेवो भव । आचार्यदेवो भव ।
एका शास्त्रकाराने तर गुरुला ब्रह्मा, विष्णु व महेश ( = शंकर ) यांचीच योग्यता बहाल केली आहे. का ? तर ब्रह्मदेव ज्याप्रमाणे निर्मिती करतो, त्याप्रमाणे गुरू हा एका अज्ञ शिष्यातून एक सुसंस्कृत व ज्ञानी माणूस ‘ निर्माण ‘ करतो. विष्णु ज्याप्रमाणे रक्षण करतो, त्याप्रमाणे गुरू हा आपल्या शिष्याचे वाईट प्रवृत्तींपासून रक्षण करतो, महेश्वर ज्याप्रमाणे संहार करतो, त्याप्रमाणे गुरु हा शिष्याच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या वाईट विकारांचा व विचारांचा नाश करतो. ‘मी कच्च्या गुरुचा चेला नाही’ असं जेव्हा शिष्य म्हणतो तेव्हा तो आपल्या गुरुबद्दलचा सार्थ अभिमानच व्यक्त करीत असतो.
पण गुरूला एवढी थोरवी देऊनही त्या शास्त्रकाराचे समाधान झाले नाही, म्हणून त्याने गुरुला परब्रह्माची उपमा दिली. गुरुंचा हा गौरव त्या शास्त्रकाराने ज्या श्लोकात केला आहे तो असा
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
या श्लोकातूनच गुरुचं मोठेपण, गुरुचं आपल्या जीवनातील स्थानलक्षात येतं. कोणतीही गोष्ट पद्धतशीर म्हणजे शास्त्रशुद्ध शिकवण्यासाठीसमर्थ गुरु लाभावा लागतो. मग ती संगीत साधना असो, क्रिकेटसारखाखेळ असो नाहीतर ‘डॉक्टरेट’ मिळवायची असो. गुरु जितका निपुण तितका विद्यार्थीही सर्वांगानं घडू शकतो. ‘आईविना माया नाही आणि गुरुविना विद्या नाही’ असं म्हणतात. एखादा गुरु अत्यंत शांत, गंभीरप्रकृतीचा असतो तर दुसरा अत्यंत तापट आणि कर्तव्य कठोर ! बालपणी साक्षात् श्रीकृष्णालासुद्धा गुरुगृही अध्ययन करावं लागलं. समिधा गोळाकराव्या लागल्या. अर्जुनाला द्रोणाचार्यांसारखे गुरु लाभले म्हणून तोधनुर्विद्येत पारंगत झाला. एकलव्याची निस्सीम भक्ती, चिकाटी ही उत्तम शिष्योत्तमाला साजेशीच होती.
शिष्याच्या मनात गुरुबद्दल अत्यंत आदराची भावना वसायला हवी. आज्ञाधारकपणाही शिष्याच्या अंगी असणं अत्यावश्यक आहे. एखादा गुरुकठोर परीक्षा घेतो. शिष्याची कसोटी पाहतो. त्याची खात्री पटली की मगच तो आपल्याकडली सगळी विद्या शिष्याच्या झोळीत टाकतो.द्रोणाचार्यांनी प्रत्येक शिष्याला विचारलेला प्रश्न या दृष्टीनं महत्त्वाचा आहे.’तुला झाडावर काय दिसतंय?’ या प्रश्नाला प्रत्येक शिष्यानं आपल्यापरीनं उत्तर दिलं. मात्र अर्जुन म्हणाला, ‘मला पक्ष्याचा डोळा दिसतोय.’निश्चित ध्येय आणि त्यासाठी करावी लागणारी तपश्चर्या असल्याशिवायईप्सित साध्य होत नाही, हेच अर्जुनानं या उत्तरातून सिद्ध करून दाखवलं.
बस्स ! गुरूपौर्णिमेनिमित्त आज मी माझ्या गुरुंना ही आदरांजली अर्पण करतो व माझे
भाषण संपवतो.
जयहिंद ! जय महाराष्ट्र !
सूचना: हे भाषण ३ ते ४ मिनिटांचे असून दिलेल्या वेळेत ते पूर्ण करण्यासाठी भाषण देताना वेळेवर लक्ष असू द्यावे.