मंगळागौर माहिती
जर तुम्हाला यावर्षी मंगळागौर साजरी करायची आहे. पण अधिक मास आल्यामुळे ती नक्की कधी साजरी करायची हे कळत नाहीये. या लेखांमध्ये आपण जाणून घेऊया कुठल्या महिन्यात मंगळागौर करायची आणि त्याच्या तारखा काय काय आहे, मंगळागौरीची माहिती आणि पूजा विधी.
मंगळागौरीचा उत्सव
श्रावण महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौर साजरी करण्याची पद्धत आहे.
सामान्यपणे मुलीचे लग्न झाल्यानंतर पाच वर्षापर्यंत स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात.
गौरीचे व्रत हे सौभाग्य देते आणि पतीचे आयुष्य वाढवते अशी समजूत आहे.
या पूजेत मंगळागौरी किंवा अन्नपूर्णा च्या मूर्तीचे पूजन केले जाते
मंगळागौर कुठल्या महिन्यापासून आणि कधीपासून करावी – Mangalagaur puja kadhi karayachi
यावेळी अधिकमास आल्यामुळे श्रावण महिना हा दोनदा आला आहे. आणि हा अधिक मास 18 जुलै ते 16 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणार आहे.
त्यानंतर जो निज श्रावण येणार आहे या महिन्यात मंगळागौरीची पूजा प्रत्येक मंगळवारी आपणास करावयाची आहे.
मंगळागौर का साजरी करतात?
भगवान शंकराला जसा श्रावण सोमवार प्रिय आहे तसेच पार्वती देवीला प्रत्येक श्रावण मंगळवार प्रिय आहे. गौरीची पूजा म्हणजे देवी पार्वती ची पूजा. हे मंगळागौरीचे व्रत सासरची माहेरची सुख समृद्धी वाढावी म्हणून केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी मंगळागौर साजरी केली जातेच, पण त्याचबरोबर भारतात इतर बऱ्याच ठिकाणीही मंगळागौर साजरी केली जाते.
यावर्षीच्या मंगळागौरीच्या तारखा – Mangalagauri Dates 2023
22 ऑगस्ट 2023
29 ऑगस्ट 2023
5 सप्टेंबर 2023
12 सप्टेंबर 2023
वर दिलेल्या तारखा अर्थातच मंगळवारच्या आणि निज श्रावण महिन्यातील आहे.
व्रत कसे करायचे – Mangalagaur vrat
श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. असे हे व्रत पाच वर्ष करून, पाचव्या वर्षी आईला वाण दिले जाते. त्याबरोबरच व्रताचे उद्यापन केले जाते. या पूजेसाठी सासर माहेरच्या मंडळीं व्यतिरिक्त, इतर नवविवाहित ओळखीच्या मुलींना बोलवले जाते. या दिवशी सर्व स्त्रिया पारंपारिक वस्त्र म्हणजे साड्या दागिने परिधान करून या पूजेसाठी येतात. येणाऱ्या सर्व स्त्रिया एक ते पाच वर्षांपूर्वी लग्न झालेल्या असतात. ही पूजा जी स्त्री करत असेल ती सोडून बाकीच्या ज्या महिला आलेल्या असतात त्यांना वशेळी असे म्हटले जाते. या पूजेला कमीत कमी पाच वशेळ्यां असल्या पाहिजे. अशाप्रकारे लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी एका मंगळवारी वशेळ्यांना बोलून पूजा करावी. आणि पुढील वर्षापासून इतर मुलींच्या मंगळागौरीसाठी वशेळी म्हणून जावे.
मंगळागौरीची पूजा कशी करावी – Mangalagaur puja kashi karayachi
मंगळागौरीची पूजा ही भक्ती पूर्वक व मौनाने करावी. पूजेला लागणारे सर्व पदार्थ व वस्तू तयार ठेवावेत. मंगळागौरीच्या पूजेत 16 ला महत्त्व आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टी या सोळा च्या संख्येत अर्पण करावे. पूजेसाठी धोतरा, शेवंती, दुर्वा, आघाडा, वगैरे सोळा प्रकारचे पत्री व फुले असावी लागतात. एका ताटात हळदीकुंकू, काजळ, करंडा, फणी, तांदूळ, खण, नारळ सुपारी, विडा व दक्षिणा वगैरे पदार्थ घालून ते वाण आपल्या मातेस अगर मातेकडील सुवासिनी द्यावे त्याचप्रमाणे ब्राह्मणासही वाण द्यावे.
दुपारी सुहासिनींसह न बोलता मिष्टान्न भोजन करावे. आरती करून, सुवासिनींच्या ओट्या भराव्यात. रात्री भोजन करू नये.
मंगळागौरीचे खेळ – Mangalagauri che khel
मंगळागौरीची ओळख म्हणजे मंगळागौरीची खेळ मंगळागौर ही याच्या खेळामुळे जास्ती प्रसिद्ध आहे.
मुलींनी मंगळागौरीचे खेळ, गाणी, नृत्य, फुगड्या वगैरे प्रकारांनी सर्व रात्र मोठ्या आनंदात घालावी.
मंगळागौरीचे खेळ खेळताना मंगळागौरीचे विशेष गाणी आणि खेळ हे खेळले जातात.
दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीस सौभाग द्रव्य अर्पण करून, विसर्जन करावे गौरीची प्रतिमा असल्यास ब्राह्मणास दान द्यावी.
मंगळागौरीसाठी लागणाऱ्या सोळा पत्री आणि फुले – Mangalagaur pujesathi sola phule ani patri
पत्री –
- आघाडा
- तुळस
- चमेली
- अर्जुनसादडा
- जाई
- डाळिंब
- कण्हेर
- डोरली
- दुर्वा
- धोत्रा
- रुई
- बेल
- बोर
- मका
- मोगरा
- विष्णुक्रांता
मंगळागौरीची आरती – Mangalagaurichi Aarati
जय देवी मंगळागौरी।
ओंवाळीन सोनियाताटीं ।
रत्नांचे दिवे ।
माणिकांच्या वाती।
हिरेया मोती ज्योती ॥ धृ.॥
मंगळमूर्ती उपजली कार्या ।
प्रसन्न झाली अल्पायुषी राया।
तिष्ठली राज्यबाळी ।
अहवेपण द्यावया ॥१॥
पूजेला ग आणिती।
जाईजुईच्या कळ्या ।
सोळा तिकटीं सोळा दूर्वा ।
सोळा परींची पत्री।
जाईजुई आंबुल्या।
शेवंती नागचाफे।
पारिजातकें मनोहरें ।
गोकर्ण महाफुलें।
नदेटें तगरें।
पूजेला ग आणिलीं ॥२॥
साळीचे तांदूळ मुगाची डाळ ।
आळणी खिचडी रांधिती नारी।
आपुल्या पतीलागीं।
सेवा करिती फार ॥ ३ ॥
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती।
कळावी कांकणें गौरीला शोभती।
शोभती बाजूबंद कानीं कापांचे गाभे।
ल्यायिली अंबा शोभे ॥ ४ ॥
न्हाउनी माखुनी मौनीं बैसली ।
पाटावाची चोळी क्षीरोदक नेसली।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पूजूं लागली ॥ ५ ॥
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती ।
मध्यें उजळती कापुराच्या वाती ।
करा धूप दीप आर्ती।
नैवेद्य षडरस पक्कानें।
ताटीं भरा बोनें ॥ ६ ॥
लवलाहें तिघें काशीसीं निघाली।
माउली मंगळागौर भिजवूं विसरली ।
मागुती परतुनीयां आली।
अंबा स्वयंभू देखिली।
देउळ सोनियाचें।
खांब हिरेयांचे ।
कळस मोतियांचा ।
जय देवी मंगळागौरी।
ओंवाळीन सोनियाताटी ॥७॥