गुढीपाडवा माहिती मराठी – Gudi Padwa Information in Marathi
हा दिवस हिंदूंच्या वर्षाचा पहिला दिवस हिंदू लोकांचे जे महत्त्वाचे सण आहेत, त्यांपैकी हा सण आहे.
हा दिवस साडेतीन मुहूतांपैकी असल्यामुळे त्या दिवशी कोणतेही नवे काम करण्यास प्रारंभ करावा. त्यासाठी जाणून घ्या मुहूर्त गुढीपाडव्याचा.
- गुढीपाडवा माहिती मराठी – Gudi Padwa Information in Marathi
- गुढीपाडवा शुभ मुहूर्त – चैत्र शुद्ध प्रतिपदा
- गुढीपाडव्याच्या कथा
- शालिवाहन शके म्हणजे काय / शालिवाहन शक कोणी सुरु केला? (Shalivahan Shak)
- गुढीपाडवा नाव कसे पडले
- गुढी कशी उभारावी (Gudi Kashi Ubharavi in Marathi)
- गुढीपाडव्याला कडुनिंब आणि साखर याच्या मिश्रणाचे महत्त्व
- गुढी कशी उतरवावी
गुढीपाडवा शुभ मुहूर्त – चैत्र शुद्ध प्रतिपदा
तारीख: | 09 एप्रिल 2024 |
वार: | मंगळवार |
तिथीची सुरवात: | 08 एप्रिल 2024 रोजी 11:50 पासुन. |
तिथीची समाप्ती: | 09 एप्रिल 2024 रोजी 08:30 पर्यंत. |
गुढीपाडव्याच्या कथा
गुढीपाडवा सणाच्या काही कथा प्रचलित आहेत, त्या अशा
- ब्रह्माण्ड पुराण चा संदर्भा प्रमाणे याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि सत्ययुगाला सुरुवात झाली.
ब्रम्ह ध्वज म्हणून घरोघरी गुढी हि उभारली जाते - प्रभू रामचंद्रांनी दुष्ट वालीचा, इतर राक्षसांचा आणि राक्षसी प्रवृत्तीचा पराभव याच दिवशी केला.
- चौदा वर्षांचा वनवास भोगून आणि सीतेला कपटाने पळवून नेणाऱ्या दुष्ट रावणाचा त्याच्या बहुतांश गणगोतासह – संहार करून,
विजयी प्रभू रामचंद्र हे पत्नी सीता, बंधु लक्ष्मण व आपल्या हनुमंतादि स्नेह्यांसह याच दिवशी अयोध्येस परत आले.
आनंदाचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारली जाते. - नारद ऋषीस (नारदीस) साठ पुत्र झाले. हीच साठ संवत्सरे होत. या प्रत्येक संवत्सराचा पहिला दिवस देवांनी गुढया,
तोरणे उभारून साजरा केला. तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय.
शालिवाहन शके म्हणजे काय / शालिवाहन शक कोणी सुरु केला? (Shalivahan Shak)
धार्मिक विधी व रुढीः चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवाहन शकाच्या वर्षाचा पहिला दिवस होय. महाराष्ट्रातील पैठण व आसपासचा प्रदेश यांवर
राज्य करणारा प्रजावत्सल व पराक्रमी राजा शालिवाहन यानेही परकीय हुणांचा पुरता बीमोड करून याच दिवशी राजधानीत प्रवेश केला.
या दोन्ही प्रसंगी प्रजाजनांनी घरोघरी गुढ्या म्हणजे विजयपताका उभारून आनंदोत्सव साजरा केला.
राजा शालिवाहनाने या तिथीपासून आपल्या नावाचा ‘ शालिवाहन शक ‘ सुरू केला. तेव्हापासून शालिवाहन शके हे नाव पडले.
गुढीपाडवा नाव कसे पडले
विद्येप्रमाणेच पराक्रमाचेही पूजक असलेले मराठीभाषिक लोक या तिथीला घडलेल्या या दोन स्फूर्तिदायी व आनंददायी घटनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ
गेली शेकडो वर्षे या तिथीला घरोघरी गुढ्या उभारीत आले आहेत.
महाराष्ट्रात चालू असलेल्या या शालिवाहन शकानुसार, चैत्र हा वर्षाचा पहिला महिना असून
त्या महिन्याची शुद्ध प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस आहे. या प्रतिपदेच्या दिवशी घरोघरी गुढ्या उभारल्या जात असल्यामुळे,
या तिथीला ‘ गुढीपाडवा ‘ असे नाव पडले.
त्यादिवशी सर्व स्त्री-पुरुषांनी पहाटेस उठून सकाळची कामे आटपावी. स्त्रियांनी घरासमोरील अंगणात उत्तम प्रकारची रांगोळी घालावी.
घरातील सर्व लहानथोर मंडळींनी अंगास सुवासिक तेल लावून ऊन पाण्याने स्नान करावे. नवीन कपडे घालावेत.
देवांची पूजा उत्तम फुलांनी करावी. घरासमोर आंब्याच्या पानांची तोरणे बांधावीत.
गुढी कशी उभारावी (Gudi Kashi Ubharavi in Marathi)
घरातील सर्वात वडील मनुष्याने एक वेळूची (बांबूची) मोठी काठी आणून ती स्वच्छ धुवून, तिच्या शेवटास तांबडे वस्त्र व
फुलांची माळ बांधावी व वर भांडे वा लोटी ठेवावी. अशा रीतीने ती तयार केलेली वेळूची काठी
दारासमोर रांगोळी घातलेल्या जागेवर उभी करावी. (अशा काठीला ‘गुढी’ असे म्हणतात. धर्मशास्त्रात यालाच ‘ब्रह्मध्वज’ असे म्हटले आहे.)
नंतर तिची पूजा करावी. गुढी उभारतात म्हणून त्या दिवसाला ‘गुढीपाडवा’ असेही म्हणतात.
गुढीपाडव्याला कडुनिंब आणि साखर याच्या मिश्रणाचे महत्त्व
गुढीची पूजा केल्यानंतर कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन ती वाटावी व त्यात मिरी, हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ वगैरे पदार्थ घालावेत.
मग ते मिश्रण सर्व लहानथोर मंडळींनी थोडे थोडे खावे. त्या योगाने कडूनिंब खाणाराचे शरीर तेजस्वी व निरोगी बनते.
एकतर असे मिश्रण खाणे प्रकृतीला चांगले असते; शिवाय, जीवनात उज्ज्वल यशाची गुढी उभारण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात
व अनेक संकटांनाही तोंड द्यावे लागते. त्यामुळे यशाचा गोड आनंद हा घेतलेल्या कष्टांच्या कटु स्मृतींनी काहीसा भरलेला असतो.
त्याचे प्रतीक म्हणून कडुलिंब व साखर यांचे कडूगोड मिश्रण खायचे असते.
गुढी कशी उतरवावी
दुपारचे पक्वान्नयुक्त जेवण तयार झाले की, त्याचा एक नैवेद्य गुढीला दाखवून मग जेवायचे. संध्याकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी गुढी उतरून खाली घ्यायची.
‘जीवनात यशाची गुढी उभारण्यासाठी मी माझ्या मनात असलेल्या ध्येयाचा अखंड ध्यास घेऊन, व त्याकरिता अखंड प्रयत्न करून,
येत्या वर्षात ते ध्येय किंवा त्याचा काही टप्पा तरी साध्य करीन, ‘ अशी प्रतिज्ञा त्या गुढीपुढे करणे,
हीच त्या गुढीची खरीखुरी पूजा. या दिवशी मुले पाटीपूजन करतात.
याच महिन्याच्या शुद्ध नवमीस श्रीरामजन्मोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात येत असल्याने, त्याच्या उत्सवास गुढीपाडव्यापासून सुरुवात होते.
त्यानिमित्त गावोगावच्या श्रीराममंदिरांतून नामवंत कीर्तनकारांची कीर्तने सुरू होतात.