Hanuman Jayanti 2023: हनुमान जयंती कधी आहे? कथा, गोष्ट आणि हनुमानाचे महत्व

हनुमान जयंती 2023 (चैत्र शुद्ध पौर्णिमा)

किष्किंधा नगरीत व आसपासच्या वनप्रदेशात राहणाऱ्या हजारो वानरांचा-म्हणजे वन्य जमातीच्या लोकांचा-सेनापती केसरी व त्याची धर्मशील पत्नी अंजनी यांना वायु-देवाच्या कृपेने चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाचे वेळी एक तेज:पुंज व असामान्य सामर्थ्याचा पुत्र झाला. नुकतेच क्षितिजावर येऊ लागलेले ते लालबुंद सूर्यबिंब पाहून त्या बाळाला हे पिकलेले फळ वाटले व ते फळ पकडण्यासाठी ते बाळ त्या बिंबाच्या दिशेने झेप घेऊ लागले. हे पाहून’ हा मुलगा मोठा झाल्यावर आपल्याला भारी होईल, ‘ असे पाहून इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते त्या बाळाच्या हनुवटीला लागून ते बाळ जमिनीवर मूर्च्छितावस्थेत पडले, या प्रकाराने रागावून गेलेल्या वायुदेवाने देवलोकातील हवा शोषून घ्यायला सुरुवात केली. हवा विरळ होऊ लागताच जिवाचा कोंडमारा होऊ लागून, इंद्रादि देव वायुदेव व केसरी यांना शरण गेले व त्यांनी त्यांची क्षमा मागून बाळाला पूर्ववत् चांगले केले. मरुतीच्या म्हणजे वायुदेवाच्या कृपेने पुत्र झाला, म्हणून केसरी व अंजनी यांनी त्या बाळाचे नाव ‘ मारुति’ असे ठेवले, तर इंद्राच्या बजाने बाळाच्या हनुवटीला जखम केली, म्हणून लोक त्याला ‘ हनुमान ‘ असे संबोधू लागले.

कधी आहे हनुमान जयंती?

हनुमान जयंती तिथी

तारीख: 06 एप्रिल 2023
वार: गुरुवार
तिथीची सुरवात: 05 एप्रिल 2023 रोजी सकाळी 09:19 पासुन.
तिथीची समाप्ती: 06 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10:04 पर्यंत.

हनुमान जयंती साजरी केली जाते. कारण हनुमन्ताने स्वतःच्या अंतर्बाध शत्रूंवर विजय मिळविला होता, इंद्रजितासारख्या बाह्य शत्रूला तर या इंद्रियजित हनुमंताने जिंकलेच होते पण मनामध्ये असलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादि असुरावरही त्याने विजय प्राप्त केला होता. सीतेच्या शोधासाठी तो लंकेत गेला त्यावेळी अनेक सुंदर स्त्रियाना त्याने पाहिले होते पण त्याचे मन चलित झाले नाही. भगवान रामासारखा खजिना ज्याला प्राप्त झाला होता त्याला आणखी संसारी सुखसंपत्तीचा लोभ कोठून असणार ! स्वतः जे काही केले आहे ते रामाच्या शक्तीमुळेच घडलेले आहे अशी अंतःकरणापासूनची भावना जेथे असेल तेथे मद व अभिमान कोठून संभवतील !

हनुमान आणि राम यांचे नाते

रावणाने सीतेला कपटाने पळवून नेल्यानंतर तिचा शोध घेत फिरत असता, रामप्रभूंची व हनुमंताची गाठ पडली, आणि त्या पहिल्याच भेटीत हनुमंताची श्रीरामप्रभूंवर भक्ती जडली. सीतेचा शोध हनुमंतानेच लावला. रामप्रभूंची सुग्रीवाशी मैत्री घडवून आणून, हनुमंताने सुग्रीवाचं प्रचंड सैन्य रामप्रभूंच्या मागे उभं केलं व त्यांना रावणाशी झालेल्या युद्धात विजयी केलं. मारुतीशिवाय रामायण, म्हणजे मिठाशिवाय स्वैपाक, पण एवढं प्रचंड साहाय्य करूनसुद्धा श्रीहनुमंताने श्रीरामप्रभूंकडून त्यांच्या एकमेकांच्या प्रेमा-खेरीज दुसऱ्या कशाचीही अपेक्षा केली नाही.

हनुमान नुसताच शक्तिमान नव्हता. तो बुद्धिमान व निष्ठावानही होता. त्याचं जसं रामरायांवर असामान्य प्रेम होतं, तसंच रामारायांचंही त्याच्यावर प्रेम होतं. म्हणूनच श्रीरामप्रभूंच्या प्रत्येक मंदिरात त्यांच्या मूर्तीजवळच हात जोडलेला हनुमानही काटकोनात उभा असलेला दिसतो. लोकांनी शक्तिमान, बुद्धिमान व मनोनिग्रही बनावे, म्हणूनच समर्थ रामदासांनी हनुमंताची ठिकठिकाणी मंदिरे उभारून लोकांपुढे त्याचा आदर्श ठेवला.

बल बुद्धी-संपन्न हनुमान

हनुमान बल बुद्धी-संपन्न होता. त्याला मानसशास्त्र, राजनीती, साहित्य, तत्त्वज्ञान वगैरे शास्त्रांचे सखोल ज्ञान होते. त्याला अकरावा व्याकरणकार व रुद्राचा अवतार मानण्यात येते त्याच्यात फार मोठी विद्वता होती. त्याची वक्तृत्व-शक्तीदेखील अजब होती. हनुमंताच्या वाणीतून ज्ञाननिष्ठ वैचारिक प्रवाह आणि सरळ पण अर्थगंभीर भाषाप्रवाह वाहात आहे असे ऐकणाराला वाटत असे. ‘

हनुमंताचा मानस-शास्त्राचा सखोल अभ्यास

हनुमंताचा मानस-शास्त्राचा फारच सखोल अभ्यास होता. त्याच्या मुत्सद्देगिरीवर व विद्वत्तेवर रामाचाही अद्भुत विश्वास होता. बिमीषण शत्रू राज्याचा सचीव व रावणाचा भाऊ रामाकडे येतो. तो कोणत्या हेतूने आला आहे, त्याला स्वपक्षात घ्यायचे की नाहो; याबाबतीत रामाने सल्ला विचारताच सुप्रीवापासून प्रत्येकाने अशा अटीतटीच्या वेळी बिभीषणाचा स्वीकार करायला नकार दिला. सर्वांचे ऐकून घेतल्यावर रामाने हनुमंताचे मत विचारले. हनुमंताने तत्काळ त्याचा स्वीकार करावा असे मत दिले. रामाने हनुमंताचे मत मान्य केले. कारण माणसाला ओळखण्याची हनुमंताची शक्ती राम जाणत होता.

जनसमुदायाच्या हृदयात रामाएवढेच आदरणीय स्थान हनुमंताला

लंकेत जायला श्री रामांना समुद्रात पूल बांधावा लागला पण हनुमान उड्डाण करून श्रीलंकेत गेला.  हनुमंताच्या उड्डाणाने भक्ताचा महिमा वाढला. मुलाच्या पराक्रमाने बाप आनंदित होतो, शिष्याकडून हरण्यात गुरु गौरव मानतो, तशी भक्ताच्या महिमावृद्धीमध्ये प्रभु प्रसन्नताच अनुभवतो. ज्याचे चिन्तन भगवान करतो अशा महापुरुषांपैकी हनुमान एक आहे. माणसे तर त्याचे चिन्तन करतीलच. आज हजारों वर्षांपासून जनसमुदायाच्या हृदयात रामाएवढेच आदरणीय स्थान हनुमंताला लाभले आहे.

पुरुषोत्तम

उत्तरकांडात राम हनुमंताला प्राज्ञ, धीर, वीर, राजनीतिनिपुण बगैरे विशेषणानी संबोधतो, यावरूनच त्याची उच्चतम योग्यतेची कल्पना येऊ शकते. हनुमान सीतेचा शोध करून आला त्यावेळी श्रीराम म्हणतो: हनुमंता ! तुझे माझ्यावर अगणित उपकार आहेत. त्याच्यासाठी माझा एक एक प्राण काढून दिला तरी ते कमीच पडेल. कारण तुझे माझ्यावरील प्रेम पंचप्राणापेक्षा विशेष आहे, म्हणून मी तुला फक्त आलिंगनच  देतो. ‘एकैकस्योपकारस्य प्राणान् दास्यामि ते कपे।’ राम म्हणतो को, ते हनुमंताने इतके दुष्कर कार्य केलेले आहे की, इतर लोक ते स्वप्नातही करू शकणार नाहीत. धन्य हनुमान कीं, जो वानर असूनही, ज्याने प्रभूच्या स्वमुखातून ‘पुरुषोत्तम’ पदवी प्राप्त करून, प्रभूच्या बरोबरीचं स्थान प्राप्त केले.

स्वतंत्र बुद्धि आणि प्रज्ञाशक्ती

हनुमंताजवळ स्वतंत्र बुद्धि आणि प्रज्ञाशक्ती होतो. अशोकवाटिकेत आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेल्या सीतेला प्रभु रामचंद्राचा समाचार सांगण्यापूर्वी त्याने झाडामागे उभे राहून इक्ष्वाकु कुळाचे वर्णन सुरू केले. हनुमंताने मानसिक भूमिका तयार करून सीतेच्या हृदयात विश्वास निर्माण केला; त्यानंतरच रामदूत म्हणून स्वतःचा परिचय करून दिला.

लंका दहन हे काही हनुमंताची माकडचेष्टा नव्हती, तर राजकारण विशारदाचे पूर्ण विचार करून केलेले कृत्य होते. लंकादहनामध्ये पूर्ण राजनीती आहे. त्याच्याद्वारे त्याने लंकेतील राक्षस प्रजेचा आत्मप्रत्यय खलास केला. लंका-दहन करून हनुमंताने युद्धाचे अर्धे काम पुरे केले आहे.

रामाची भक्ती

हनुमान रामाचा पूर्ण भक्त होता. तो प्रत्युत्पन्नमति होता. रामाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. रावणाला मारल्यानंतर सीतेला संदेश पोचविण्या- साठी राम हनुमंताला पाठवतो. अयोध्येत प्रवेश करण्यापूर्वी भरताच्या चेहऱ्यावर रामाच्या आगमनाचा विकार होतो की नाही ते पाहाण्यासाठी देखील राम हनुमंतालाच पाठवतो. अर्थात् या नाजुक प्रसंगी महत्त्वाची कामगिरी पूर्ण बुद्धी चालवून हनुमानच करू शकतो. नाजुकात नाजुक व कठोरात कठोर कामही हनुमान सफलतेने पार पाडीत असे.

हनुमंताचा दास्य भावही अतिशय उत्कृष्ट आहे. राम हनुमंताला विचारतो : ‘तुला काय पाहिजे ? ‘ त्यावेळी, ‘माझी तुमच्यावरील प्रेमभक्ती कमी न व्हावी आणि रामाशिवाय दुसरा भाव न निर्माण व्हावा एवढेच पाहिजे’ असे उत्तर त्याने दिले होते. जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत हनुमान अमरच राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *