होलिका दहन हे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला केलं जाते. होळीचा उत्सव म्हणजे वसंताला वाढवणारा उत्सव.
आज आपण या लेखात होळी बद्दलची माहिती जाणून घेऊया.
होळी सणाची माहिती मराठी / होळी हा सण कसा साजरा करतात (फाल्गुन पौर्णिमा)
होलिका दहन म्हणजे फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पौर्णिमा. या दिवशी हिरण्यकश्यपू ची बहिण होलिका हीचे दहन झाले होते.
याशिवाय हुंढा नावाची राक्षसीण बालकांना त्रास देते; परंतु या दिवशी बोंब मारली असता ती पळून जाते असे म्हणतात व
त्यामुळेच या दिवशी बोंब मारण्याची प्रथा पडली असावी. श्रीशंकरांनी याच दिवशी मदनास जाळले,
त्यावेळी शंकरांनी सांगितले, की या दिवसाची आठवण म्हणून सर्वांनी होळी करावी व श्रीशंकरांच्या आज्ञेप्रमाणे या दिवशी होलिकोत्सव
साजरा करण्याची प्रथा पडली. पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी लो आपल्या घरासमोर वा सार्वजनिक ठिकाणी गोवऱ्या व लाकडे पेटवून
होळी करतात. होळीची पूजा करून आत नारळ टाकतात व बोंबा मारतात. होळी मागे वातावरणातील हानीकारक जंतू मरावेत व वातावरण
शुद्ध व्हावे असाही हेतू असण्याचा संभव आहे.
होळीची गोष्ट / हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाची कहाणी
होळीचा उत्सव म्हणजे वसंताला वाढवणारा उत्सव ! होळीच्या उत्सवामागे असलेली कथा देखील फारच प्रसिद्ध आहे.
हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस राजा होता. त्याला सर्वत्र हिरण्य म्हणजे सोनेच दिसत होते. राक्षस म्हणजे खा, प्या, मजा करा,
अशा मनोवृत्तीचा मानव. जनेतेच्या गरजांकडे त्यानं पूर्णपणे दुर्लक्ष केलं होत. तो स्वतःलाच देव समजू लागला होता.
त्यामुळे तो दुसऱ्या कुठल्याही देवाला मानत नव्हता.
प्रल्हादाचा जन्म
म्हणतात ना चिखलात कमळ उगवते, तसे त्याच्या घरात प्रल्हादासारखा देवभक्त पुत्र जन्मला. प्रल्हाद जेव्हा गर्भात होता त्यावेळी
त्याची आई नारदाच्या आश्रमात राहिली होती. तेथील संस्कारांचा परिणाम प्रल्हादावर झाला होता.
प्रल्हादाचे अंतःकरण भगवद्भक्तीने भरलेले होते. त्याच्या वडिलांनी म्हणजेच हिरण्यकश्यपू ने त्याला बदलण्याचे खूप प्रयत्न केले
पण निष्ठावान बालकाला बदलण्यात ते असमर्थ ठरले.
होलिका दहन
प्रल्हादाची देवावरची भक्ती जर सर्वत्र माहीत झाली तर आपल्या स्वार्थासाठी असलेल्या आपल्या राज्याची मुळेच ढिली होतील,
असे हिरण्यकश्यपूला वाटले. आसुरी वृत्तीचा बाप मुलाच्या असल्या गोष्टी कसा चालवून घेईल? प्रल्हादाला बदलण्याचे प्रयत्न सफल होत नाही
हे बघून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. त्यातील एक म्हणजे त्याला जिवंत अग्नीत फेकून देणे.
प्रल्हाद अग्नितून उठून पळून जाऊ नये म्हणून त्याला त्याच्या आत्याच्या मांडीवर बसविले,
हिराण्यकश्यपूच्या बहिणीला – होलिकेला वरदान होते की, तिने जर सद्वृत्तीच्या माणसाला त्रास दिला नाही
तर अग्नी तिला जाळणार नाही. स्वतःच्या भावाच्या आग्रहाला वश होऊन होलिकेने प्रल्हादाला मांडीवर घेऊन
अग्नीमध्ये बसायचे कबूल केले. परिणाम जो व्हायचा तोच झाला. त्यात होलिका जळून भस्म झाली;
तर सद्वृत्तीचा ईश्वरनिष्ठ प्रल्हाद हसत खेळत बाहेर आला. होलिका-पूजन हे असद्वृत्तीच्या नाशासाठी तसेच सदवृत्तीच्या रक्षणासाठी
लोकांच्या हृदयात असलेल्या शुभ भावनांचे प्रतीक आहे आणि म्हणूनच लोक आनंदाने होलिकेचे स्वागत करतात.
धूलीवंदन / होळी चा दुसरा दिवस (फाल्गुन कृष्ण प्रतिपदा)
होलिका दहनामुळे खुश झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला. आनंदाच्या वातावरणाने रंगीत बनलेले लोक एकमेकांवर रंग, गुलाल वगैरे
उडवू लागले. शिवाय काहीनी होळीच्या दुसऱ्या दिवशी होळी जळून जी राख राहिली होती ती आणि इतर धूळ उडवायला सुरुवात केली
आणि त्यामुळे ‘धुळवट’ निर्माण झाली. आकाशातील रंग आणि धरतीवरील धूळ ह्यांचे ह्या उत्सवात मीलन झालेले आहे.
लहान-मोठा मेद विसरून, महालात आणि झोपडीत राहाणारे लोक एकत्र येऊन नाचू लागले. पण प्रत्यक्षात रंगपंचमी हि होळी च्या
पाच दिवसांनी येते.
होळीमध्ये केवळ निकामी बस्तु किंवा कचराच जाळला पाहिजे असे नाही तर आपल्या जीवनात असलेले आपणास त्रास देणारे खोटे विचार
तसाच मनाचा मळ किंवा कचराही जाळला पाहिजे. संघनिष्ठेला शिथिल बनवणारे खोटे तर्ककुतर्क ह्या होळीत दहन केले पाहिजेत.
रंगपंचमी (फाल्गुन कृष्ण पंचमी)
हा खरा रंग खेळण्याचा दिवस आहे पण भारतात खूप ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशीच रंग खेळले जातात. जसे मुंबई मध्ये रंग
होळीच्या दुसऱ्या दिवशी खेळतात पण नाशिक मध्ये रंगपंचमीला रंग खेळले जातात. गोकुळात असताना भगवान श्रीकृष्ण त्यांचे
सवंगडी व गोपिकां सोबत रंग आणि रंगाचे पाणी खेळत असे. त्यामुळे उन्हाची झळ कमी लागण्यास मदत व्हायची.
त्यामुळे रंगपंचमीच विशेष आणि आध्यत्मिक महत्व आहे. या दिवशी स्त्रिया व पुरुष दोघेही आपल्या मैत्रिणी व मित्रांच्या अंगावर
रंग उडवतात. लहान मुलेही त्यात सहभागी होतात. या दिवशी देवाला स्नान घालून नवीन वस्त्र नेसवावे व देवावर केशरी रंग उडवावा.
वरील सण व उत्सव करण्यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत. पहिले म्हणजे या निमित्ताने ईश्वरसेवा होते, त्याच्या स्मरणात दिवस
आनंदात जाऊन मन प्रसन्न होते.