Solah somvar vrat katha in marathi: सोळा सोमवार व्रत कथा

solah somvar vrat katha marathi
सोळा सोमवारचे व्रत आणि कथा

सोळा सोमवार व्रत

चातुर्मासात सोळा सोमवारांचे व्रत केल्यास अभीष्ट प्राप्ती होते. शरीरातील शक्तिकेंद्रे जागृत होतात. स्त्री-पुरुषांनी आणि कुमारिकांनीही हे व्रत अवश्य करावे. या व्रताची कथा अवश्य श्रवण करावी. व्रतकाळात व्रतस्थ राहावे. या व्रताच्या योगे अनेक अवघड कार्ये पूर्ण होतात.

16 सोमवार व्रत विधि / 16 सोमवार व्रत नियम मराठी

प्रथम व्रत करणाऱ्या स्त्रीने सकाळी नहावे. नंतर दुधात थोडी कणीक भिजवावी. गाकर (छोट्या पुरीच्या आकाराच्या गव्हाच्या जाड भाकऱ्या) करून खरपूस भाजावेत. गार झाल्यावर सव्वा पावशेर गूळ घेऊन किसावा. गाकराचा कुस्करा करावा. त्यांत गूळ मिसळून मुटके वळता येईल इतपत तूप घालावे. एकजीव करावे व त्यांचे तीन सारखे भाग करावेत. एक देवास, एक ब्राह्मणास व एक गाईस. दिवसभर चहापाणी काहीही घ्यावयाचे नाही. संध्याकाळी चारच्या सुमारास शंकराची पूजा करून त्याला १०८ बेलाची पाने वाहावीत. १०८ पाने न मिळाल्यास ७, ९, ११ अशी मिळाली आणि वाहिली तरी चालतात. इतकीही न मिळाल्यास एक पान वाहिले तरी चालते. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महादेवाला नैवेद्य दाखवून तो स्वतः खावा व एका दमात जेवढे पाणी पिता येईल तेवढेच पाणी प्यावे व उपवास सोडावा. बाकीच्या दोन भागापैकी एक भाग गाईला खावयास द्यावा व दुसरा भाग ब्राह्मणाला द्यावा. असे सोळा सोमवार करावेत. अशा तऱ्हेने सोळा खडीसाखरेचे सोमवारही करतात. सव्वा पावशेर खडीसाखरेचे तीन भाग करावेत. एक भाग गाईला, एक भाग देवाला व एक भाग ब्राह्मणाला असे सोळा सोमवार वरीलप्रमाणे करावेत व सतरावे सोमवारी उद्यापन करावे.

सोळा सोमवार व्रताचे उद्यापन

सव्वा पाच शेर गहू वरीलप्रमाणेच दळावेत. तितकाच किंवा थोडा कमी गूळ घ्यावा. वर लिहिल्याप्रमाणेच तूप घालून गाकर करावेत. देवाला गाकराचा नैवेद्य दाखवावा. देवळात कोणी असतील, त्यांना थोडा प्रसाद द्यावा. ४-५ लाडू गाईला खावयास घालावेत. ४-५ लाडू ब्राह्मणाला द्यावेत व उरलेल्या लाडूचा प्रसाद घरात सर्वांना जेवावयास वाढावा. जेवण्यास जोडीला रव्याचे किंवा बेसनाचे लाडू करावेत. या दिवशी पुरुषांना व बायकांना आपल्या ऐपतीप्रमाणे
सव्वा आणा, सव्वा रुपाया दक्षिणा द्यावी. सवाष्णींची खण-नारळाने ओटी भरावी किंवा कापड देऊन ओटी भरावी. किंवा सर्वांना नुसती दक्षिणा द्यावी. शंकराला १०८ बेलाची पाने वाहावीत. ज्यांना शक्य असेल, ते लोक सोन्याचे बिल्वपत्र करून शंकराला वाहतात. याप्रमाणे सोळा सोमवारच्या व्रताची सांगता झाली. काही लोक उद्यापनाच्या दिवशी दहीभाताची पूजा बांधतात (लिंपतात) शक्तीनुसार धोतरजोडी किंवा उपरणे शंकराच्या अंगावर घालतात व पार्वतीची खणानारळाने ओटी भरतात.

सोळा सोमवारचे व्रत कधी करावे

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार पासून सोळा सोमवारचे व्रत सुरु करावे. सोळा सोमवारची पूजा सूर्य मावळण्यापूर्वी पूर्ण करावी. सूर्य मावळण्यापूर्वी हि पूजा केल्यास त्याचे फळ जातीस लाभदायक असते.

16 सोमवार व्रत कथा मराठी

आटपाट नगर होते. त्या नगरात एक महादेवाचे देऊळ होते. एके दिवशी काय झाले? शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली, सारीपाट खेळू लागली. ‘डाव कोणी जिंकला, ” म्हणून पार्वतीने गुरवाला विचारले, त्याने शंकराचे नाव सांगितले. पार्वतीला राग आला.

गुरवाला “तू कोडी होशील,” म्हणून शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या,

पुढे एके दिवशी काय झाले? देवळात स्वर्गीच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडी पाहिला. त्याला कारण विचारले. गुरवाने गिरिजेचा शाप सांगितला.

त्या म्हणाल्या, “भिऊ नकोस. तू सोळा सोमवाराचं व्रत कर. म्हणजे तुझे कोड जाईल. “

गुरव म्हणाला, “ते व्रत कसं करावं ?” अप्सरांनी सांगितले, “सारा दिवस उपवास करावा, संध्याकाळी आंघोळ करावी, शंकराची पूजा करावी. नंतर अर्धा शेर कणीक घेऊन तीत तूप, गूळ घालावा व ते खावे. मीठ त्या दिवशी खाऊ नये. त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे. सतराव्या सोमवारी पाच शेर कणीक घ्यावी. तूप, गूळ घालून चुर्मा करावा. तो देवळात न्यावा. भक्तीने शंकराची षोडशोपचारांनी पूजा करावी. नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. पुढे त्याचे तीन भाग करावेत. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग `देवळात ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावे.” असे सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढे गुरवाने ते व्रत केले. गुरव चांगला झाला.

पुढे काही दिवसांनी शंकर-पार्वती पुन्हा त्या देवळात आली. पार्वतीने गुरवाला कुष्ठरहित पाहिले, तिने गुरवाला विचारले, “तुझं कोड कशाने गेलं?”

गुरवाने सांगितले, “मी सोळा सोमवाराचं व्रत केलं, त्याने माझं कोड गेले.” पार्वतीला आश्चर्य वाटले. तिने आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिकस्वामी परत यावा म्हणून हे व्रत केले. समाप्तीनंतर कार्तिकस्वामी लागलीच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्याने आईला विचारले, “आई आई, मी तर तुजवर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली. याचं कारण काय?” पार्वतीने त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढे कार्तिक- स्वामीने ते व्रत केले.

त्याचा एक सोबती फार दिवस देशांतराला गेला होता. त्याची सहज रस्त्यात भेट झाली. पुढे कार्तिकस्वामीने हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितले. त्याने लग्नाचा हेतू मनात धरला. मनोभावे सोळा सोमवाराचे व्रत केले. समाप्तीनंतर तो दूरच्या प्रवासाला निघाला.

फिरता फिरता एका नगरात आला. तिथे काय चमत्कार झाला? तिथल्या राजाच्या मुलीचे लग्न होते. लग्नाला अनेक देशाचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले आहेत, लग्नाची वेळ झाली आहे. पुढे राजाने हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली. ‘ज्याच्या गळ्यात हत्तीण माळ घालील, त्याला आपली मुलगी द्यायची.’ असा राजाचा पण होता. तिथे आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता. पुढे कर्मधर्मसंयोगाने ती माळ हत्तिणीने याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली. तशी राजाने आपली मुलगी त्याला दिली. दोघांचे लग्न लावले व नवरा- नवरीची बोळवण केली.

पुढे काय झाले? राजाची मुलगी मोठी झाली. तशी दोघे नवरा-बायको एके दिवशी खोलीत बसली आहेत, तसे बायकोने नवऱ्याला विचारले, “कोणत्या पुण्याने मी आपणाला प्राप्त झाले?” त्याने तिला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचीती पाहाण्यासाठी पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला.

तो मोठा झाल्यावर त्याने आईला विचारले, “मी कोणत्या पुण्याने तुला प्राप्त झालो?” तिने त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्याने राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली. तो व्रत करू लागला व देशपर्यटनाला निघाला; परंतु तिकडे काय चमत्कार झाला ?

फिरता फिरता तो एका नगरात गेला. त्या राजाला मुलगा नव्हता. एक मुलगी मात्र होती. तेव्हा कोणी तरी एखादा सुंदर, गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावे, असा त्याने विचार केला. अनायासे त्या पुत्राची गाठ पडली. राजाने त्याला पाहिले, तो राजचिन्ह दृष्टीस पडली. राजाने त्याला घरी आणले. कन्यादान केले व आनंदाने त्याला आप राज्यावर बसवले.

इतके होत आहे, तो या ब्राह्मणपुत्राचा सतरावा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देवळात गेला. घरी बायकोला निरोप पाठविला, “पाच शेर कणकीचा चुर्मा ताबडतोब पाठवून दे!”

राणीने आपला थोरपणा मनात आणला. चुर्म्याला लोक हसतील, म्हणून एका तबकात पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले. चुर्मा वेळेवर आला नाही. व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला. त्याने राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला ?

“राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील, दारिद्र्याने पीडशील?” असा शाप दिला.

पुढे दुसरे दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानाला सांगितली. तो म्हणाला, “महाराज, राज्य हे तिच्या बापाचे. आपण असे करू लागलो तर लोक दोष देतील. यासाठी असे करणे अयोग्य आहे. “

राजा म्हणाला, “ईश्वराचा दृष्टान्त अमान्य करणे हेही अयोग्य आहे.” मग उभयतांनी विचार केला. तिला नगरातून हाकून लावले. पुढे ती दीन झाली. रस्त्याने जाऊ लागली. जाता जाता एका नगरात गेली. तिथे एक म्हातारीच्या घरी उतरली. तिने तिला ठेवून घेतले. खाऊ-पिऊ घातले. पुढे काय झाले ?

एके दिवशी म्हातारीने तिला चिवटे विकायला पाठविले. दैवाची गती विचित्र आहे! बाजारात ही चालली. मोठा वारा आला. सर्व चिवटे उडून गेली. तिने घरी येऊन म्हातारीला सांगितले. म्हातारीने तिला घरातून हाकून लावले.

तिथून ती एका तेल्याच्या घरी गेली. तिथे तेलाच्या घागरी भरल्या होत्या, तेल्याने त्यावर तिची नजर गेली. तसे त्यातले सगळे तेल नाहीसे झाले. म्हणून तिला घालवून दिली.

पुढे तिथून निघाली. वाटेने जाऊ लागली. जाता जाता एक नदी लागली. त्या नदीला पाणी पुष्कळ होते; पण तिची दृष्टी त्याच्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेले. पुढे जाता जाता एक सुंदर तळे लागले. त्यावर तिची दृष्टी गेली. तसे पाण्यात किडे पडले. पाणी नासून गेले. रोजच्यासारखे तळ्यावर गोवारी आले. नासके पाणी पाहून परतले. गुरेढोरे तान्हेली राहिली. पुढे काय झाले ?

तिथे एक गोसावी आला. त्याने तिला पाहिले. कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिने सगळी हकीगत सांगितली. गोसाव्याने तिला धर्मकन्या मानली. आपले घरी घेऊन आला. तिथे राहून ती कामधंदा करू लागली. जिकडे- तिकडे हिची दृष्टी जाई, त्यात किडे पडावेत, काही जिनसा आपोआप नाहीशा व्हाव्यात, असा चमत्कार होऊ लागला.

मग गोसाव्याने विचार केला. अंतर्दृष्टी लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचे पाप आले आहे, असे त्याला जाणवले. ते नाहीसे केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही, असे ठरवले.

मग त्याने शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्याने राणीबद्दल प्रार्थना केली. शंकराने त्याला सोळा सोमवारचे व्रत करायला सांगितले व आपण अंतर्धान पावला. पुढे गोसाव्याने तिच्याकडून सोळा सोमवारांचे व्रत करविले. तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला.

तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली. दूत चोहीकडे शोधायला पाठविले. शोधता शोधता तिथे आले. गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिले. तसेच जाऊन त्यांनी राजा प्रधानासुद्धा गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्रप्रावर्ण देऊन संतोषित केले.

गोसावी म्हणाला, “ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतली होती, ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणिग्रहण करून सुखाने नांद!”

राजाने होय म्हटले. गोसाव्याला जोडप्याने नमस्कार केला व राणीला घेऊन आपले नगरी आला. पुढे मोठा उत्सव केला. दानदक्षिणा घेऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजाराणीची भेट झाली. आनंदाने रामराज्य करू लागली. तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा.

ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवब्राह्मणाचे द्वारी, गाईच गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण.

सोळा सोमवार व्रत कथा PDF डाउनलोड | Solah Somvar Vrat Katha PDF download

या लेखाची PDF डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा:-Solah somvar vrat katha pdf

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *